नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, July 18, 2020

सेलिब्रेटींचा ( सोशल ) डिस्टन्स पँटर्न


सेलिब्रेटींचा  ( सोशल ) डिस्टन्स पँटर्न

मंडळी नमस्कार 🙏🏻

थोडा नाजूक विषय मांडतोय  पण खूप दिवसापासून हे मनात होत. सेलिब्रेटी अर्थातच प्रसिद्ध व्यक्तींचा सोशल मीडियावर वावर  हे आता फारसे नाविन्यपूर्ण नाही . अनेकांची ट्विटर / फेसबुक खाती आहेत , अनेक सामान्य चाहते या सेलिब्रिटींचे फॉलॉवर आहेत . मुद्दा हा नाही  तर मुद्दा असा आहे की या सेलिब्रीटींना कधी त्यांच्या चाहत्यांशी गप्पा मारताना , त्यांच्याशी बोललेले किंवा त्यांच्या फ्रेंड लिस्ट मध्ये असलेल्या एखाद्याच्या पोस्टला लाईक केले आहे असे कधी तुम्ही बघितले आहे का हो ?  हा त्यांच्या स्वतःच्या वर्तुळातील बरोबरीच्या कलाकारां बरोबर / किंवा त्यांच्या इतक्याच प्रसिद्ध व्यक्तींना ते रिप्लाय देत ही असतील पण एखादा त्यांचा सर्वसामान्य चाहता आहे  त्याने समजा काही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केले , एखाद्या भूमिकेचे कौतुक केले तर  त्याला प्रतिक्रिया दिली तर एक चाहता म्हणून त्या सामान्य व्यक्तीला किती बरे वाटेल ना ?

आम्ही लहान असताना प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे नट , नट्या , मोजके खेळाडू , काही गायक यापलीकडे  फारशी कुणाची गणना प्रसिद्ध व्यक्तींच्यात ( सेलिब्रेटी) व्हायची नाही. त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होणे हे तर त्याहून दुर्मिळ असायचे . मला आठवतंय ते सांगलीत झालेल्या नाट्य संमेलनात  काही कलाकारांच्या सह्यांसाठी आम्ही मित्रांनी  झुंबड उडवलेली.  एखाद्या दुकानाच्या आजच्या भाषेत शो रूम च्या  उद्घाटनाला , शाळेत  विविध गुणदर्शन कार्यक्रम किंवा बक्षीस समारंभाला उपस्थिती  किंवा कदाचित शुटींगसाठी आपल्या गावात आलेल्या नट -नट्या यांना केवळ बघायला मिळणे इतपतच  सेलिब्रिटी लोकांशी प्रत्यक्ष संबंध यायचा . आपल्या भोवती जमणारी  ' भीड ' या लोकांना ही हवीहवीशी वाटायची.

कालांतराने सेलिब्रेटी कन्सेप्ट थोडा बदलला . केवळ नट-नट्या या प्रसिद्ध व्यक्ती  न राहता लेखक- लेखिका / कवी / कवयित्री , दिग्दर्शक,  राजकारणी , पत्रकार ,किंवा  एखाद्या विशिष्ठ क्षेत्रात कर्तृत्वाने पुढे आलेले दिग्गज, टीव्ही कलाकार  हे ही सेलिब्रेटी होऊ लागले. सोशल मीडियावर यांचा ही वावर होऊ लागला.  अरे यार तुला माहीत आहे का  अमुक - तमुक प्रसिद्ध व्यक्ती माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट पाठवलेली  त्यांनी अॅक्सेप्ट केली . मी त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात अशी चर्चा रंगू लागली.  पण नंतर  असं लक्षात यायला लागलं की हा सगळा संवाद  एकाच बाजूने झालाय . दुसरीकडून काहीही प्रतिसाद नाही . आणि मग या तमामा मोठ्या मोठ्यांच्या या सोशल - डिस्टंसींगचे आश्चर्य वाटू लागले .

अगदी मान्य की  सगळ्यांनाच रिप्लाय देणे आणि प्रत्येक वेळी देणे शक्य होईलच असे नाही , यात काही  अपप्रवृती , गैरफायदा घेणारे ही असू शकतात अगदी मान्य . आमच्यासारका उठसुठ प्रत्येक  पोस्ट ला लाईक / प्रासाद द्या असे म्हणणे अजिबात नाही 😬 मात्र  थोडासा संवाद तुमच्याकडून ही अपेक्षित. तुम्ही आम्हाला आवडता म्हणूनच आम्ही तुमच्या पेज ला लाईक केलय , तुम्हाला ऍड केलय आमच्या लिस्ट मध्ये .

पूर्वी एखाद्या कलाकाराचा अभिनय आवडला  की त्याचे अभिनंदन , कौतुक कुठे करायचे हा प्रश्न पडायचा? कदाचित त्याचे चाहते पत्र वगैरे पाठवत असतील .  आज तशी परिस्थिती नाही ईमेल / ब्लॉग / फेसबुक पेज / ट्विटर कुठेही तुम्ही अभिप्राय देऊ शकता इतके हे सेलिब्रिटी आपल्या जवळ ( हातात ) आलेत. पण या सगळ्यांनी  सोशली  - डिस्टन्स  ठेवण्यातच धन्यता मानली असेल तर आपण तरी  जास्त सोस  का करावा ? 😐

लेख संपवता संपवता एक नमूद करू इच्छितो . आमचा एक सांगलीचा मित्र आहे ' आनंद कुलकर्णी '. आजकाल सोशल मीडियावर
येणा-या उत्तम कलाकृती मग ते लेख असतील , संभाषण असेल किंवा काहीही त्या कलाकाराला  केवळ सोशल मीडियात प्रतिसाद न देता  ( कारण दिलेला प्रतिसाद एखाद्या व्हाटसप ग्रुप वरच राहतो ) शक्य असेल  त्या व्यक्तीशी फोन वर बोलून कौतुक करतो.  आज त्याचा  हा कित्ता आम्ही पण जाणीवपूर्वक अनेकवेळा गिरवत आहोत. तुमचा तो  लेख, कथा, चित्र, सामाजिक कार्य आवडले किंवा तुम्ही छान गाणे म्हणले हे सांगीतल्यावर त्या कलाकारांच्या/ व्यक्तीच्या बोलण्यातून त्याला झालेला ' आनंद ' आपल्याला  सहज जाणवतो.

तेव्हा माझा तमाम सेलिब्रीटी मंडळीनो तयार रहा. तुमच्या चाहत्यांपासून जास्त डिस्टन्स ठेऊ नका ( सध्या चालेल   ) .
आज  उद्या तुम्हाला आनंद किंवा अमोलचा ( किंवा हा लेख वाचून इतर अनेकांचा ) अभिनंदनाचा फोन केव्हाही येऊ शकतो बर का

एक मिनीट. लेख आवरता घेतोय मंडळी,  एक फोन येतोय 😉

( कला/ कलाकार प्रेमी)  अमोल
१८/०७/२०२०
poetrymazi.blogspot.com
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...