नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, July 28, 2021

पाऊस नक्षत्र आणि आधुनिक म्हणी


 "पाऊस नक्षत्र" या संदर्भात प्रचलित म्हणींची माहिती देणारा एक लेख बराच व्हायरल झालाय. छान माहिती त्यात मांडलीय पण कालानरुप त्यात बदल व्हायला पाहिजे असे वाटते.


आधी आपण मुळ म्हणी एकत्रीत वाचू


रविचा मृग प्रवेश ( ७ जून)  ते रवीचा स्वाती प्रवेश ( २५ आँक्टो) हा साधारण प्रचलित पावसाचा हंगाम. त्यानुसार क्रमाने या प्रचलित म्हणी


पडल्या मिरगा तर टिरीकडे बघा

पडतील आद्रा तर उडतील गडदरा

पडतील पुक ( पुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख

आश्लेषा- मी येते सळासळा, मामाजी तुम्ही पुढिं पळा

पडतील मघा तर चुलीपुढे हगा

पडता हस्ती कोसळतील भिंती

पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा

पडतील स्वाती तर मिळतील माणिक मोती


इथे मला पुनर्वसू, पूर्वा फाल्गुनी,उत्तरा फाल्गुनी याबद्दल काही म्हणी त्या लेखात आढळल्या नाहीत. प्रत्यक्षात असतीलही ( अर्थात आपण ती कमी भरून काढूच)


तर मंडळी मृग नक्षत्र लागण्या आधी रोहिणीत येणारा पाऊस हा 'वळवाचा' किंवा त्याला आजकाल मान्सुनपूर्व पाऊस म्हणतात.


रवीचा रोहिणी नक्षत्र कालखंड

( २५ मे ते ६ जून)

आधुनिक म्हण:

" *रोहिणीत काढू छत्री, भोकंबिकं नाहीत ना करु खात्री* " - वळवाच्या/मान्सूनपूर्व पावसाने आगामी पावसाळ्याची चाहूल लागते. छत्र्या, रेनकोट, पावसाळी बूट आठवतात आणि त्यांची वेळेवर डागडुजी, नवीन खरेदी केली जाते


रवीचा मृग नक्षत्र कालखंड ( ७ जून ते २२ जून)

आधुनिक म्हण:

" *मृगाचा कमी दाब, मुंबईकरांना लाभ* " - मान्सून केरळात, प्रवास संथगतीने,  अमुक दिवशी कोकणात/ मुंबई येणार या  बातम्यां बरोबरच बंगालच्या किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा हमखास तयार होऊन मुंबईकरांची दाणादाण उडवून टाकतो.


रवीचा  आद्रा नक्षत्र कालखंड ( २३ जून ते ५ जुलै)

आधुनिक म्हण: 

*मिठी आदराची, डुबकी कुरल्याची* :- मिठी नदी पात्राची मिठी सैल करुन बाहेर पडते आणी सायन,  कुर्ला भाग डुंबायला लागतो. या काळात म्हैस,  बेडूक, हत्ती वाहन असेल ( दरवर्षी प्रत्येक नक्षत्रात पावसाळी वाहन वेगळे असते)  तर ही मिठी पंचक्रोशीला कवेत घेते.


रवीचा पुनर्वसू नक्षत्र कालखंड ( ६ जूलै ते २० जुलै)

आधुनिक म्हण: 

*"राज्यात दुष्काळ, पुनर्वसनासाठी केंद्राला घाट*"

*राजाचा मजकूर प्रधान सेवकाला पाठ*

मुंबईत पाणी पाणी होत असताना, राज्यभर मात्र दुष्काळाची छाया पसरते, आषाढीला पांडुरंगाला साकडे आणि केंद्राकडे याचना हे सगळं ठरलेलेच.


रवीचा पुष्य नक्षत्र कालखंड (  २१ जुलै ते २ आँगस्ट) 

आधुनिक म्हण:

*"घोडा लागला ( वाहन) पुष्यात, पाऊस आला गुश्श्यात"*

आता माझी सटकली म्हणत पाऊस सगळीकडे उधळतो.


रवीचा आश्लेषा नक्षत्र कालखंड ( ३ आँगस्ट ते १७ आँगस्ट ) 

आधुनिक म्हण:

*"आश्लेषाचा भार धरणाला, नदीकाठचे वाळवंटाच्या वळणाला*"

हीच ती वेळ. धरणे भरून लागतात, पाणी सोडले जाते आणी नदीकाठच्या लोकांना आपला भाग सोडून पाणी नसलेल्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागते.


रवीचा: मघा नक्षत्र कालखंड ( १८ आँगस्ट ते २९ आँगस्ट ) 

आधुनिक म्हण:

*श्रावणात पडेल मघा, लोणावळा- खंडाळा सौंदर्य बघा*

पावसाळी सहली ख-या अर्थाने एन्जाँय करण्याची वेळ


रवीचा: पु.फाल्गुनी ते उत्तरा  फाल्गुनी कालखंड ( ३० आँगस्ट ते २६ सप्टेंबर  ) 

आधुनिक म्हण:

*पडेल फाल्गुनी, राजांचे दर्शन होई घरुनी*

:- गणेशोत्सवाचा कालखंड,  या कालावधीतला पाऊस भक्तांच्या उत्साहावर विरजण घालतो 


रवीचा: हस्त नक्षत्र  कालखंड ( २७ सप्टेंबर ते ९ आँक्टोंबर  )

आधुनिक म्हण:

*पडू दे किंवा नको पडू दे हस्त, खड्ड्यांनी केंव्हाच रस्ता केलाय फस्त*:

:- आपल्या हातात फक्त मलिष्काची गाणी ऐकणे 


रवीचा: चित्रा नक्षत्र  कालखंड ( १० आँक्टोंबर ते  २४ आँक्टोंबर )

आधुनिक म्हण: 

" *माळेत जर अडकली चित्रा, कसा खेळशील गरबा मित्रा* "

घटस्थापनेला पाऊस असेल तर माळेत अडकतो आणि अडचणी वाढवतो.


रवीचा: स्वाती नक्षत्र  कालखंड( २५ आँक्टोंबर ते ६ नोव्हेंबर )

आधुनिक म्हण: 

*पडू नको स्वाती नाहीतर दिवाळीची होईल माती*

:- आजकाल पाऊस पण दिवाळीचे उटणे लावूनच जातो.


साधारण पावसाचे चक्र असेच दिसून येते.

मंडळी, या आधुनिक म्हणी आवडल्या असतील तर. खालील इमेल वर  प्रतिक्रिया नक्की द्या.  


अमोल केळकर 📝

a.Kelkar9@gmail.com

आषाढ कृ. षष्ठी

२९/०७/२१


#पाऊस_नक्षत्र

#आधुनिक_मनोरंजन

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...