नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, March 17, 2022

रंगोत्सव


 रंगोत्सव - आठवणीतील गाणी 🌈🎨


आज सोसायटीत रंग खेळते राधी

गोपाळा, जरा जपून जा तुझ्या घरी

किंवा 

कृष्णे , उडवू नको रंग थांब, थांब ,थांब


अगदी बरोबर वाचताय. असे प्रसंग आजच्या काळात धुळवड/ रंगपंचमीला गावोगावी दिसून येतायत समस्त गोपाळां समवेत समस्त राधीका रंगांचा उत्सव साजरा करण्यात बरोबरीने पुढे आहेत. 


निसर्ग तर सर्वच ऋतूत कायमच 'रंगोत्सवात' दंग असतो. यातला खरा जादुगार  'आकाश'. 'नभाला बरोबर घेऊन वेगवेगळे प्रयोग नित्य चालू असतात.

बदलती नभाचे 'रंग' कसे?

क्षणात निळसर,क्षणात लालस,क्षण सोनेरी दिसे !

अशा बदलत्या नभाखालती

वसते अवनी सदा बदलती

कळी कालची आज टपोरे फूल होऊनिया हसे!

बदलती नभाचे 'रंग' कसे?


रोज सूर्योदयाला ;-

नवकिरणांचे दूत निघाले पूर्व दिशेहून नाचत नाचत

नवीन गाणी ओठावरती किलबिलते पक्षांची पंगत

सोनेरी स्वप्नांची झालर पहाटवा-यावरती विहरत

नवीन चेतना भरुन घ्यावी ज्याने त्याने हृदयागारी

उल्हासाचे 'रंग' भरले नभांतरी दशदिशांतरी


तर मंडळी तब्बल २ वर्षाच्या खंडानंतर आज हा रंगोत्सव * साजरा करायला मिळतोय. तेंव्हा

घुमवा लेझीम ढोल नगारा

आज नाचवू गावच सारा

सनई - पावा घुमवा सूर

संगीताला आणा पूर

टाळ्या झडवा द्या ठेका

रंग फेका रंग रे, रंग फेका 🎨


आणि मग

  "अवघा रंग एक " होऊ दे

आणि रंगी रंगू दे  श्रीरंग ( श्रीवल्ली)


शेवटी प्रत्येक सण ( क्षण) आपल्याला काय सांगतो  


नाही भेदाचे ते काम

पळोनी गेले क्रोध काम!


अवघा रंग एक झाला 


रंगोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा 🙏💐☺️


अमोल

poetrymazi.blogspot.com

धुळवड/ रंगपंचमी * २०२२ 📝

Monday, March 7, 2022

महिला दिन. कृत्तिका नक्षत्र


 फुलांचा सुंदर गुच्छ, कर्रेबाज पण कर्तृत्ववान

                     " कृत्तिका " 💐

            ( महिला दिन विशेष) 


आज ८ मार्च २०२२. आज कृत्तिका नक्षत्र आहे.  श्री प्र सु आंबेकर यांनी त्यांच्या 'नक्षत्र ज्योतिष' पुस्तकात कृत्तिका नक्षत्राची माहिती देताना हे वरचे वाक्य लिहिले आहे.

 या नक्षत्राच्या उत्पत्ती बद्दलची कथा ही त्यांनी दिली आहे.


थंडीचे दिवस,उत्तर ध्रुवाजवळील काळोख्या रात्रीचा प्रदेश. सप्तऋषी आपल्या प्रियपत्नींसह प्रवासास निघाले होते. मुक्कामाला पोहोचण्याची सर्वानाच घाई होती.पण कडाक्याच्या थंडी मुळे पाय मात्र उचलत नव्हते.प्रवास करता करता मंडळी 'अग्नी' या प्रखर ता-याजवळ आली. अग्नीची उष्णता गारठलेल्या मंडळीना फारच सुखावह वाटली. जरावेळाने सप्तऋषी इच्छित स्थळी जाण्यास निघाले पण वसिष्ठांची पत्नी 'अरुंधती' फक्त त्यांच्याबरोबर निघाली. इतर सहा ऋषीपत्नी मात्र अग्नीजवळच शेकत बसल्या. अग्नी पासून मिळणारी उब त्यांना सोडवेना.


या मागे राहिलेल्या ऋषीपत्नी म्हणजेच "कृत्तिका" होत.


कृत्तिका नक्षत्रावर जन्म असणाऱ्या स्त्रियांचे वर्णन पुढे असं केलंय: - स्वभाव मानी, रागीट,करारी जरा गर्विष्ठ असतो. कृत्तिकेचे सौंदर्य हे लवंगी मिरचीप्रमाणे तिखट सौंदर्य आहे.बोलणे फटकळ असते.तरीही या स्त्रीया महत्वाकांक्षी, पराक्रमी व कर्तृत्ववान असतात. 


आज आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना अनेक महिल्यांच्या कर्तृत्वाच्या गोष्टी ऐकताना/ वाचताना असे वाटते की यांच्या पत्रिकेत एखादा ग्रह नक्कीच कृत्तिका नक्षत्रात असेल.  


शिल्पा शेट्टी,वैजयंतीमाला, विजयालक्ष्मी पंडीत,नलिनी जयवंत या काही प्रसिद्ध स्त्रियांचे जन्म नक्षत्र ' कृत्तिका ' हे आहे



आता थोडं वरच्या ऋषींच्या कथेकडे .  नव-याच्या आज्ञेत राहणारी ऋषीपत्नी आणि नव-याला बोलू न शकणारी  'आई कुठे काय करते ' मधील पण स्त्री ' अरुंधतीच? नावातील असा ही एक योगायोग 😬


 तर, सध्याच्या जीवनशैलीला अनुसरून 'कृत्तिकेचा' एखादा गुण तुमच्याकडे असू दे, याच समस्त स्त्री वर्गास आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्य शुभेच्छा 💐


अमोल केळकर 📝

poetrymazi.blogspot.com

०८/०३/२२

Friday, March 4, 2022

प्रासंगिक


 प्रासंगिक 📝


'झुंड' असो वा 'झोंबी'(वली)

एकाच नाण्याच्या बाजू दोन

बुध्दी दिलीय ना देवाने

मग स्वतंत्र विचार करणार कोण?


दोन्ही गोष्टी मिळून जेंव्हा

जाती/पातीला मिळतो सहारा

आपणच आपल्यावर मग

द्यायचा असतो पहारा


#

झुंडीत_पाहू_झोंबीत_राहू_करीत_जाऊ_द्वेष_साजरा


फाल्गुन शु तृतीया

५/३/२२

Wednesday, March 2, 2022

रात्रं दिन आम्हा


 अनेक वर्षे मार्केटिंग मधे काम करणाऱ्या आम्हाला ही परिस्थिती नवीन नाही


'कस्टमर' ( रशिया ) - timely shipments,  shipment quantity, गुणवत्ता,  ,पेमेंट क्रेडीट, ट्रान्सपोर्टर इ इ मिसाईल्स 🚀


मॅनेजमेंट ( NATO) - घ्या रे आँर्डर आम्ही आहोत. करु व्यवस्थित सगळं,   


सेल्स मॅन ( युक्रेन)  - नाही साहेब बघताय ना परिस्थिती,  लाॅकडाऊन,  सुट्या,  पेट्रोल-डिझेलचे वाढलेले भाव, युध्द, पुढल्यावेळेला आधीच देतो साहेब, बस का साहेब !आत्तापर्यंत असं झालं का? , लागून सुट्ट्या आल्या ना, सर्व्हर डाऊन होता ना, दोन दिवस SAP प्राँब्लेम होता, अहो शनिवारीच मी डिओ ( DO) देऊन ठेवलेला तुमच्या माणसानं घेतला नाही तर आम्ही काय करणार ?, थोडं तरी पेमेंट करा ना मग मॅनेजमेंट ला सांगता येईल,  नक्की साहेब, होय साहेब, राॅ मटेरियल किती वाढलय बघताय ना? आम्ही मार्जीन काहीच ठेवले नाही आहे यावेळेला सर,  ट्रान्सपोर्ट चा स्ट्राईक नव्हता का? डाॅलर चा रेट बघा की साहेब, तुम्ही काळजी करु नका आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्हीच तर आमचे टाॅप कस्टमर आहात की


साहेब, मार्च महिना आलाय शेवटचा महिना, नवीन 'परचेस आँर्डर ' ( PO) उद्या पर्यंत पाठवाल ना? मी प्रोसेस चालू करतोय, याच महिन्यात शिप करतो.

टार्गेटच्या जरा जवळ तरी जाऊ 


काय पण होऊ दे 'झुकेगा नही' अँडीट्युड असणाऱ्या आणि ' इयर एन्ड टार्गेट' साठी रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग या परिस्थितीतून जाणाऱ्या सर्व लेवल वरच्या सेल्समॅन/ सेल्स गर्ल्सना समर्पित  👩🏼‍💼👨🏻‍💼🙏💐


( साधा विक्रेता )  अमोल 📝🏃🏻‍♂️


poetrymazi.blogspot.com

Friday, February 18, 2022

पोळीचा मामला


 पोळी- पुराण 📝 ( प्रासंगिक *- मनोरंजन) 🫓


( मुळ गाणे:- चोरीचा मामला, मामा ही थांबला) 



पोळीचा मामला,मामु ही थांबला

प्रेमानं घास खाती

होय त्यांची मैना, उडवते दैना

या ' किचन कट्ट्यावरती' 

डाळ सारी घेतली, वाटूनही काढली

तुम्ही माझ्या 'कटाचे ' साथी

थोडा वेळ बसा, तोंड बंद ठेवा 

या पस्तीस पोळ्यां साठी 


( ये ना मामी, तू गा ना ... )


तूप अशी तू, ठेवू नको

पोळी अरधी घालू नको

पोट उपाशी, भूक लागली

कसला हा सुटलाय वारा 🤧


जास्त जिवाला खाऊ नको

ध्यास असा हा घेऊ नको

गडी व-हाडी उभा टाके हा

खर्ड्याचा लागे ठसका


( ये ना मामी, तू गा ना ... )


पोळीचा मामला,मामु ही थांबला

प्रेमानं घास खाती

होय त्यांची मैना, उडवते दैना

या ' किचन कट्ट्यावरती' 


१८/०२/२२

poetrymazi.blogspot.com

Tuesday, February 15, 2022

झुकेगा नही.. साला


 ' झुकेगा नही  .. साला ...... ' 🙅‍♂️



' दुनीया झुकती  है , झुकानेवाला चाहिये' या डायलॉग ला काउंटर  अँटेक  केलेला एक  डायलॉग सध्या सगळीकडे धुमाकूळ घालत आहे तो  म्हणजे  ' झुकेगा नही  .. साला '. हे वाक्य  माणसाचा अँटिट्यूड दर्शवतो.  राशी स्वभावानुसार सिंह रास किंवा लग्नी रवी, मंगळ  असणा-या व्यक्ती सर्वसाधारणपणे  अशा स्वभावाच्या असण्याची शक्यता जास्त असते. 



सर्वपक्षीय भ्रष्ट राजकारणी नेते, कार्यकर्ते किंवा गुंड  लोकांनी हे वाक्य उचलून धरले नसते तर नवल पण तुमच्या आमच्या मध्ये ही असा attitude  दाखवणारे सहज भेटतील. सध्या अशी कॉमन जागा म्हणजे कुठलाही ' काय अप्पा ' समूह . इकडच्या तिकडच्या ढकली मेसेज वरून, ऐकीव माहिती, चार न्यूज चॅनेलवरून घेतलेल्या माहितीवर कुठलाही अभ्यास न करता  एकाद्या मुद्यावर व्यक्त होताना  त्यांचा आवेश

 ' झुकेगा नाही ... साला ' असाच असतो . मला वाटत अशा लोकांना खालील  काही गाणी 👇🏻अशी ऐकू आली असणार


' झुकाना  भी नाही आता , 

झुक जाना नाही तू काही हार के , 

झुक झुक के न देख झुक झुक के 

गब्बरसिंह ये कहके गया , जो झुक गया, वो मर गया 


'मुलाचे पाय पाळण्यात दिसतात'  त्याप्रमाणे अशा व्यक्ती तुम्ही शाळेत वर्गात असतानाच ओळखल्या पाहिजे होत्या. एक तास संपून  दुसरे  शिक्षक येईपर्यतच्या कालावधीत साधारण सर्वच  दंगा करतात पण नवीन सर येऊन  पुढचा वर्ग सुरु झाल्यावरही  दंगा सुरु ठेवणारे  आणि  सरांनी वर्गाबाहेर कोंबडा करून उभे केल्यावरही मनातल्या मनात  ' झुकेगा नाही साला ...  अशी समजूत करुन घेणारे ते हेच 😷


 या शब्दाचा भावार्थ ' नमतं न घेणे ' असा बरोबर वाटतो. पण कितीही झुकेगा नाही असा attitude  असणारे  लहानपणी  लपंडाव वगैरे खेळताना झुकून कुठे कुठे लपलेत, त्यांची  मुलं -बाळं  लहान असताना  स्वत: झुकून घोडा झालेत आणि अजूनही  बायकोसमोर ... राहू दे  जास्त व्यय्यक्तिक   नको. ☺️


पण हा शब्द प्रयोग प्रत्यक्षात आचरणात आणलेल्या   आणि परकीय आक्रमणापुढे खंबीर उभे राहणा-या राजे, महाराजे, स्वातंत्र्यसैनिक आणि त्याचा वारसा पुढे चालवणारे आपले शूर जवान यांच्यामुळे आज आपले जीवन सुसह्य आहे यात शंका नाही 🙏


बरं , मी काय म्हणतो, ' झुकेगा  नही .. ' वाल्यांनी एकदा नमतं घेऊन बघायला काय हरकत आहे ???


अहो तो  फ्रान्स मधला तो टॉवर  पण झुकलाय, तुम्हाला काय झालं ओ  न झुकायला ??? 🤷‍♂️


निसर्ग ही वेळोवेळी झुकतो जसे 

" वो झुक गया आसमान भी '   तेव्हा  कुठं  ' इष्क नया रंग लाया ' 🌈


 कधी कधी #झुकना_अच्छा_है 🙋🏻‍♂️


( लवचिक ) अमोल  🙇🏻‍♂️

माघ पौर्णिमा 

१६/२/२२


टीप : किती पण लिही चुकूनही ( झुकूनही ) लाईक देणार नाही  यावर ठाम असणा-या सर्व प्रिय मित्र मैत्रिणीना सदर लेखन  समर्पित 😝

Saturday, February 12, 2022

मिर्च्ची रेडिओ


 दादर पूर्व आणि दादर पश्चिम जोडणारा परळ/ प्रभादेवी बाजूचा पादचारी पूल,  तसेच त्या पूलापासुन कबुतरखाना आणि पूर्वेला पनवेलचा बस स्टाँप एवढा विस्तृत आमचा माॅल होता. इथल्या खरेदीची मजा त्रिखंडात नाही. अँमेझाँन वगैरे हे आत्ताचे लाड. खरेदीसाठी दादरला जाणे किंवा कामासाठी दादर ला गेल्यावर या 'ओपन टू स्काय ' माॅल मधील खरेदी न होणे म्हणजे फाँल समजायचा


तर साधारण १५-२० वर्षापूर्वी जेंव्हा एवढा ' मोबाईल स्मार्ट नव्हता ' किंवा फक्त संपर्कासाठी ज्याचा उपयोग व्हायचा त्याकाळात या आमच्या ओपन माॅल मधे एक मिरची सारखे उपकरण आले होते. आणि अल्पावधीत ते भयंकर लोकप्रिय झाले होते.


त्या मिरची सारख्या उपकरणात दोन तिन बटणे, अँटेना ,कानात घालायला हेडफोन आणि दोन पेन सेल


एकेकाळी मुंबई मार्केट मधे अधिराज्य केलेला हाच तो ' मिर्ची रेडीओ'

सुरवातीला १५० ते २०० रु पर्यत मिळणारा हा रेडिओ नंतर नंतर सर्रास १०० रु मिळाला लागला आणि खास घासाघीस करुन अगदी ८० पर्यत


असा हा रेडिओ खिशाला पेनासारखा अडकवून रस्त्यावर फिरणे ही एक क्रेझ होती


मात्र ही मिरची घालून बस किंवा रेल्वेत बसलं की तिने मान टाकलीच समजायचं

चायनात पिकलेली ही मिरची वाशी खाडी पूल ओलांडे पर्यत जरी टिकली तरी पैसे वसूल असे वाटायचे


आज १३ फेब्रुवारी  , विश्व रेडिओ दिवसा निमित्य या  'तिखट ठरलेल्या मिर्च्ची रेडिओची ' एक आठवण


(📻) अमोल 📝

माघ.शु द्वादशी

१३/२/२२

Friday, February 11, 2022

ग्रहांकीत प्रेम


 

पाडगावकरांची माफी मागून सादर करतोय

 'ग्रहांकीत प्रेम ' 📝❣️


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं


काय म्हणता?

या ओळी चिल्लर वाटतात?

काव्याच्या दृष्टीने अगदी थिल्लर वाटतात?


असल्या तर असू दे

फसल्या तर फसु दे

तरीसुद्धा 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं 💕


पंचमातील शुक्राकडून 

प्रेम करता येतं

सप्तमातील 'राहू' कडून

आंतरजातीय होता येतं

घरचा विरोध पत्करून

गुरुजींना धरता येतं

'गुण-मिलन' न करता ही 3️⃣6️⃣

पळून जाता येतं 


म्हणूनच म्हणतो, -

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं 💞


जसं डोक्यात राग घातलेल्या 'मेषेच' असतं

तसंच डंख मारणाऱ्या ' वृश्चिकेचं ' असतं

या राशी आपल्या मानणा-या मंगळालाही 

प्रेमाचं मर्म चांगलच माहित असतं 


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं 💕


नटण्या मुरणा-या ' वृषभेला '

समतोल 'तुळेची ' साथ असते

राशी स्वामी 'शुक्राचे' मात्र

'शनिशी ' अधेमधे नाते तुटते

'प्रजापती' ची उलटी भूमिका

पालकांना अधून मधून डसत असते 

( जरा बघता का हो पत्रिका म्हणत

ज्योतिषाकडे त्यांची विनंती असते) 

त्यांनाही परत तेच सांगतो...


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

तुमच्या आमच्या पत्रिकेत अगदी सेम नसतं ❤‍🔥


असाच एक जण चक्क मला म्हणाला,

आम्ही कधी पत्रिकेच्या 

मागे लागलो नाही

दोन मुलं झाली तरी

त्यांचीही पत्रिका काढली नाही


आमचं काही नडलं का?

पत्रिकेशिवाय अडलं का?


त्याला वाटलं मला पटलं!

तेंव्हा मी इतकचं म्हणलं 


कर्म कर्म कर्म म्हणजे कर्म असतं

ते ही सगळ्यांच्या पत्रिकेत सेम नसतं 💘


(पंचमेश)  अमोल 📝

माघ. शु. एकादशी

१२/०२/२२


poetrymazi.blogspot.in

Saturday, February 5, 2022

श्रध्दांजली


 ग्रहांच्या उच्च - निच राशी असतात तसा काहीसा प्रकार स्वरांचा ही असावा. 

म्हणजे स्वर एकच पण तो काहींच्या गळ्यातून येताना उच्च होतो तर काहींच्या गळ्यातून येताना नीच होतो.



पण एक गळा, ज्यातून उमटणारे स्वर हे कायमच उच्च, वर्गोत्तम होऊन

ल - य

ता- ल 

यांचा अलौकिक सोहळा बनायचे .


आज ते स्वर , संगीत विश्व  पोरके झाले.


 श्रध्दांजली 🙏🙏


अमोल केळकर 📝


#लता_मंगेशकर

Friday, February 4, 2022

मुंबई _लोकल_नवीन_जहिरात ( प्रासंगिक)


 मुंबई _लोकल_नवीन_जहिरात *

 ( प्रासंगिक )



फलाटाची उंची, लोकलचे पायदान

काळजी घ्या किंचीत

३% घटस्फोटापासून मग

कायमचे रहा  वंचित


वसंत पंचमी 📝

५/२/२२

#पळती लोकल पकडू या, मामींचे फंडे ऐकू या 😷

Sunday, January 30, 2022

रेश्माच्या बाबांनी


 सरकारच्या या निर्णयावर मात्र अनेक भाविकांकडून स्वागतच झाले असल्याचे  एकंदर चित्र सोशल मिडियावर दिसते आहे🍷*


मग आमच्या रेश्माचे बाबा कसे मागे राहतील?

( प्रासंगिक 📝 * )


रेश्माच्या बांबानी, 'लाल पांढ-या' वाईननी

आठवडी बाजार हा आणिला

उगा नका पाहू त्यांच्या यादीला 


नवी कोरी यादी लाख-मोलाची

पाहिली ती रांग पुढे जाण्याची

घुसले बंडू नाना, मित्रवर्ग जोडीला 


उगा नका पाहू त्यांच्या यादीला 


जात होते सारे सारे तो-यात

शुक्र-मंगळाच्या त्या हो-यात

कुणी चकण्याला, डाळ-शेव घेतीला

उगा नका पाहू त्यांच्या यादीला


भीड नका ठेऊ, आल्यागेल्याची

मिरवा ओझी दहा पिशव्यांची

कुणी काही म्हणू  (दे) तुमच्या खरेदीला (खोडीला)

उगा नका पाहू त्यांच्या यादीला


( प्रासंगिक)  अमोल 

सोमवती पौष अमावास्या

३१/०१/२०२२

Sunday, January 23, 2022

सांत्वन


 सांत्वन

काल एक आमचा मित्र गेला. वर्गमित्र नव्हता पण आम्ही एका शाळेत होतो. एक दोन वर्ष लहान असेल  पण शाळेला एकत्र जाणे,  कौटुंबिक परिचय, सुट्टीत एकत्र खेळणे, कालांतराने त्याचे शिक्षणासाठी आणि आमची नोकरी निमित्य एका गावी येणे,  आणि मध्यंतरी सुटलेला संपर्क परत सोशल मिडियामुळे प्रस्थापित होणे,  विविध राजकीय - सामाजीक आणि धार्मिक गोष्टीत सहभागाने परत एकदा ऋणानुबंध तयार होणे हे आजकाल सर्रास आढळणा-या चक्रातून आमचा ही झालेला प्रवास


आणि काल सोशल मिडियावरच त्याच्याबद्दल कळलेली बातमी. वयाच्या ४३-४४ मधे तो गेला. केवढा प्रचंड आघात त्याच्या कुटुंबीयांवर झाला असेल. नात्यानुसार जवळच्या व्यक्तीला सावरायला वेळ लागेल. सोशल मिडियापासून ते प्रत्यक्ष घरी जाऊन अनेक जण मानसिक आधार देतील, सांत्वन करतील, आणि कालचक्र पुढे जात राहील


सर्वसाधारण घडणारी ही गोष्ट . पण यात एक महत्वाची व्यक्ती दूर राहते आणि माझ्या मते त्या व्यक्तीला ही आधाराची गरज असते ती व्यक्ती म्हणजे गेलेल्याचा जवळचा मित्र. त्या जवळच्या मित्राचा कदाचित कुटुंबातील सदस्यांशी  जवळीक नसते पण ते एकमेकांचे अगदी खास दोस्त आहेत अशी ख्याती मित्र परिवारात असते. तेंव्हा अशा मित्राला ही आधार देणे, त्याला बोलते करणे, त्याच्यावरचा ताण कमी करणे हे इतर मित्रांना नक्की करण्यासारखे आहे.


काहीही असो पण अशा घटनांना इथूनपुढे आपल्याला सगळ्यांनाच सामोरे जावे लागणार आहे.


'जन काय, पळभर म्हणतील हाय हाय!


अमोल 

२३/१/२२

Saturday, January 15, 2022

शेंदूर लेपन


 सध्या अनेक देवदेवतांचे आँन- लाईन दर्शन, सकाळ- संध्याकाळ आरतीची सोय त्या त्या देवस्थानने करुन दिली आहे. अनेक भाविक अशाप्रकारे दर्शनाचा लाभ घेतच असतात

प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाला पूर्वी महिन्यातून एकदा जायचोच पण गेली २ वर्ष हे शक्य होत नाही आहे. पण  देवस्थानने करुन दिलेल्या सोईने दर्शन घेणे मात्र सहज साध्य झाले आहे. 



असेच दर्शन घेतानाचा हा कालचा फोटो. नियमित दर्शन न  घेणाऱ्यांना हा सिद्धीविनायक थोडा वेगळा वाटेल. होय ते बरोबरच आहे कारण ही धातूची मूर्ती काही दिवसासाठी दर्शनाला ठेवतात . मग मुळ मूर्ती?


तर साधारण गणेश जयंतीच्या आधी मुळ मूर्ती जी गाभाऱ्यात आहे तीला शेंदूर लेपन करतात आणि तोपर्यत मुळ गाभाऱ्याचे दार बंद करुन ही उत्सव मूर्ती भाविकांसाठी दर्शनाला ठेवतात.


थोडंसं वैचारिक. आपलं दैवत ही छान दिसावं, त्याच्याकडे पाहून मन प्रसन्न व्हावं, आनंद वाटावा म्हणून दरवर्षी मूर्तीला अपडेट करतो आपण. 

असं आपण ही अपडेट व्हायला काय हरकत आहे? 


आपल्या अवतीभवती अशी अपडेट करुन देणारी जी 'सौंदर्य मंदिरे' आहेत आणि तिथून बाहेर पडणारी आपली आजी/आई/बायको/ बहिण/ मुलगी/पुतणी/भाच्ची /काकू/मावशी/आत्या/वहिनी आणि हो 'मैत्रीणी'  पण जेंव्हा 'ब्यूटी' 'फूल ' होऊन येतात तेंव्हा त्यांचा नक्की आदर करा हेच यानिमित्याने  सांगणे ☺️


शुभ रविवार 📝

पौष शु. चतुर्दशी

१६/०१/२२ 

www.poetrymazi.blogspot.com

Monday, January 10, 2022

मंगळवारची पहाट


 मंगळवारची पहाट . सिध्दिविनायक मंदिरात दर्शनाला  जाण्यासाठी पहिली लोकल पकडून दादरला उतरलो आणि टिळक ब्रीजच्या बाजूने प्लाझाकडे चाललो. रात्री दुतर्फा रस्त्यावर ठिकठिकाणी लागलेल्या शेकोट्या अजूनही धुमसत होत्या. 

पहाटेच्या धुक्यात मंद दिसणारे दोन दिवे हे शेअर टँक्सी चे असू देत अशी मनोमन प्रार्थना केली आणि तसेच घडले.

खच्चून भरलेल्या टँक्सीत फूल हिटर लावल्यानंतरही घामाचा एक ही बिंदू न येता प्रभादेवीला उतरून दर्शन रांगेतून पुण्याच्या सारसबागेतील स्वेटर मधे असलेल्या गणपतीप्रमाणेच प्रभादेवीच्या बाप्पाला बघताना मन प्रसन्न झाले. कुडकुडत कुडकुडत त्याही अवस्थेत उंदीर मामाच्या कानात इच्छा व्यक्त केली की बाप्पाला सांग पूर्वीचे 'घामाचे'( अन कामाचे) दिवस लवकर आण रे देवा'

दर्शन घेऊन परत दादरला आल्यावर छबिलदासच्या दुकानात गरमगरम वडा पाव बरोबरच शेगडीवरची कणसं विकली जात होती. प्रसादाचे कणीस घेऊन स्टेशन कडे निघालो 

दादर स्टेशनच्या फलाट नं १ वर टिटवाळा स्लो पकडून खिडकी कडे झेप घेतली आणि थबकलो. चक्क बर्फ बिंदू जमा झाले होते. हाताचा स्पर्श करुन तो बर्फ थोडा ओंजळीत घेण्यासाठी हातातील ग्लोज काढले तोवर शीव स्टेशन आले होते आणि ओळखीच्या आवाजात उद्घोषणा होत होती


शीव,  शीव , शीव. वर्क फाॅर्म होम म्हणत सूर्य डोक्यावर येईपर्यंत एवढी ताणून द्यायची?  त्यात काय थंडीची फूस. आम्हाला नाही वाटत आराम करावा? पण आहे का सूट  #@*&&


आणी गाडी जी सुसाट सुटली.. .की विचारु नका 😷

 

( गारठलेला ,आजच्या पुरता WFH वाला)  अमोल 📝

११/१/२२

Saturday, January 8, 2022

रामदास कामत


 रामदास कामतजी,  

भावपूर्ण श्रध्दांजली 🙏



"प्रथम तुज ऐकता, जीव वेडावला"


 नाट्यगीतांची आवड निर्माण व्हायला अर्थातच तुमच्या स्वरांचा मोठा वाटा होता .


देवा तुझा मी सोनार

नको विसरू संकेत मिलनाचा

हे आदिमा  हे अंतिमा

बहुत दिन नच भेटलो सुंदरीला

प्रेम वरदान स्मर सदा


ही काही गाणी तुमच्या आवाजात ऐकणे हा सुखसोहळा असायचा


अर्थात शेवटी

' देवाघरचे ज्ञात कुणाला '?


तरीही नाट्यसंगीत आणि रामदासजी कामत ही केमिस्ट्री कायम लक्षात राहील अगदी

'विश्व'नाट्य' सूत्रधार,तूच श्यामसुंदरा'

 या ओळींप्रमाणे


म्हणूनच म्हणावेसे वाटते

' चिरंजीव राहो जगी नाम रामा' 


🙏🙏


📝 ९/०१/२२

poetrymazi.blogspot.com

Wednesday, December 29, 2021

मागची खिडकी


 मागची खिडकी


सध्या नवीन आलेल्या सिटी-बस मधून जर तुम्ही प्रवास केला असेल, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की बसमधील सिटची रचना वेगळ्या स्वरूपात आहे. म्हणजे पूर्वी कसं चालकाच्या मागे एकच आडवी सिट असायची जिथे बसलं  की बसमधील  मागचे सर्व प्रवासी दिसायचे. पण आता अशा उलट सिटा बसमधे मध्यात आणि अगदी शेवटी पण बसवल्यात. शेवटी बसवलेल्या सिटा तर एवढ्या उंच आहेत की तिथे बसलं की बसच्या अगदी शेवटी असणारी मोठी खिडकी (ज्यावर 'संकटकालीन दरवाजा' असे लिहीलेले असते ) अगदी सहज लक्ष वेधून घेते.



सहसा मी या मागच्या सिटवर बसत नाही पण परवा आँफीस मधून येताना दुसरीकडे बसायला जागाच नसल्यामुळे तिथे बसायला लागले. प्रवास सुरु झाल्याक्षणी नजरेत आली ती ही संकटकालीन मदतीस धावणारी ' मागची खिडकी '


दृश्य फारसे वेगळे नाही. ट्रॅफिक जाम ,त्यातही पुढे जायला पाहणारी वाहने, बसने मागे टाकलेली वाहने. जिथे तिथे पराकोटीचा संघर्ष. 


क्षणभर एक वेगळा विचार मनात आला की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक अशी खिडकी आहे. त्याला फारतर आपण मार्गदर्शक खिडकी म्हणू. त्या खिडकीतून जरा मागे डोकावू. गेलेली अनेक वर्षे, संपणारे हे वर्ष, झालेल्या चूका, मिळालेल्या संधी, आलेल्या अडचणी आणि महत्वाचे म्हणजे आपल्याकडून घडल्या गेलेल्या चांगल्या गोष्टी/ आपण उमटवलेला ठसा,आपले यश


याचे विश्लेषण करुन पुढचा करायचा प्रवास.  

मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात ही अशी एक खिडकी शिकवतात SWOT ANALYSIS म्हणून 


"बस" नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्याच मनातील 'संकटकालीन मार्गदर्शक खिडकीतून' एकदा डोकावयाचे आणि परत आपला नियमीत प्रवास सुरु ठेवायचा यासाठी तुम्हाला सगळ्यांना  शुभेच्छा 💐


( प्रवासी)  अमोल 📝

'सफला एकादशी'

३०/१२/२१


www.poetrymazi.blogspot.com

Saturday, December 18, 2021

पेपर मिळू दे मिळू दे


 रविवारची टवाळखोरी 📝*

( * प्रासंगिक मनोरंजन) 


पेपर मिळू दे मिळू दे, भावा पास होऊ दे

आली परीक्षा - परीक्षा, प्रश्ण आम्हा मिळू दे

पेपर मिळू दे मिळू दे, भावा पास होऊ दे


परीक्षार्थी पाखरा, पेपर लिही सारा

आले दलाल अंगणी, त्यांना पैसे देऊ करा

परीक्षार्थी पाखरा...।


मला पेपर दाखवी, दिसे पुढची नोकरी

आता पुस्तकं हुडकून शोधू उत्तरे ही जरा.

पेपर मिळू दे मिळू दे, भावा पास होऊ दे..।


ध्येय करुन मेरिटचा,पेपर लिहितो काॅपीचा

आता म्हाडाच्या खात्यात सेवा रुजू दे जबरा...


परीक्षार्थी पाखरा...।


पेपर मिळू दे मिळू दे, भावा पास होऊ दे

आली परीक्षा - परीक्षा, प्रश्ण आम्हा मिळू दे


( कायमचा अभ्यासू)  📝

मार्गशीर्ष कृ.प्रतिपदा

१९/१२/२१

Wednesday, December 8, 2021

मनीच लग्न


 *प्रासंगिक लग्न-सोहळा

( मनीचं लग्न 🐈‍⬛)


'मनी'sच लगीन झोकांत लागलं 

'बोको'बांवर मिम्स काढलं

'विकी'बाबा नटून मंडपात थांबला

मिडियाचा वृत्तांत इकडे तिकडे चालला


तिथे नाही 'रेंज' म्हणे पुढे येऊन सासरा

आम्ही तुमच्या 'मनी'ला देऊ कसा आसरा

मोबाईलच्या स्क्रिनचा देऊन झाला दाखला

असं म्हणताच पटकन टाॅवर ही लावला


मनी'sच लगीन झोकांत लागलं 

'बोको'बांवर मिम्स काढलं


उंदराचे पदार्थ मेजवानीला ठरले

हळदी अन संगीताचे, कार्यक्रम लांबले

तरा तरा तो-यामधे प्राणी सर्व जमले

मनीच्या लग्नाला  नियम नाही लागले


मनी'sच लगीन झोकांत लागलं 

'बोको'बांवर मिम्स काढलं 


चंपाषष्ठी 📝 ( ९/१२/२१)

Wednesday, December 1, 2021

वद जाऊ कुणाला शरण


 https://youtu.be/sRnz15t-JJc


( मुळ गाणे: वद जाऊ कुणाला शरण

नाटक : संगीत सौभद्र) 


आमचं : संगीत अभद्र 📝


वद जाऊ कुणाला शरण 

करील जो हरण 'ओमिक्राॅनचे'

मी धरीन चरण त्याचे !


अग लस-घे !!


बहु ताप बंधु- बांधवा, प्रार्थिले बघुनी दु:ख जनांचे!

ते विफल न होय त्यांचे !


अग लस-घे !!


मग जिल्हा- बंदी मात्र ती, लावुनी कष्ट इ-पासचे!

न चालेचि काही त्यांचे!


अग लस-घे !! 


जे मास्क लावुनी नाकापुढे, वाचले थवे मानवांचे !

अनुकूल होती साचे!


अग लस-घे !!  💉


📝 २/१२/२१

poetrymazi.blogspot.com

Monday, November 22, 2021

पहाटे पहाटे मला जाग आली



 २ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल...📝


पहाटे पहाटे मला जाग आली

अपुल्या सत्तेची कृती फेल झाली


मला आठवेना.. तुला आठवेना 

कशी रात्र गेली कुणाला कळेना

तरीही काकांना खबर लागली


अपुल्या सत्तेची कृती फेल झाली !


सत्तेचे डोहाळे, निमित्य कशाला?

बाजू ठेऊ या 'हात' नको ' बाणाला' 

मनमिळाऊ तात्या हे राज्यपाली


अपुल्या सत्तेची कृती फेल झाली !


कसा रामपारी सुटे गार वारा

माझ्या खुर्चीला देशील का सहारा

करु सुरवात बोलणे, हालचाली 

अपुल्या सत्तेची कृती फेल झाली !



पहाटे पहाटे मला जाग आली

अपुल्या सत्तेची कृती फेल झाली ! 🌷⏲️


कार्तिक कृ चतुर्थी ( २३/११/२१)

अंगारक योग

Related Posts Plugin for WordPress, Blogger...