नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, July 10, 2022

यंदाची वारी


 रखुमाई म्हणाली विठ्ठलाला,


काय, यंदाची वारी

काय, हे जमलेले भक्त

काय, ह्यो तुझा थाट

ओक्के मधे सगळं ...

दोन वर्षांनी यंदा आषाढीला

वाटलं सगळं आपलं


पांडुरंग म्हणाला रखुमाईला,


कसली ती महामारी

कसला तो लाॅकडाऊन

वाईट वाटत होतं दोन वर्ष

'भक्तांची' अवस्था पाहून


दुष्टचक्र संपले , 

वैष्णव सारे जमले

'भेटी लागे जीवा' म्हणत 

पालख्या, रिंगण सजले


येताना होतोच सोबत

आपणही बनून वारकरी

'थकलेल्या माऊलींसाठी 

चल, सोबत नेऊ पंढरी '


📝१०/०७/२२

अमोल

Sunday, July 3, 2022

दिस चार झाले


 मुळ गाणे: " दिस चार झाले मन, पाखरू होऊन" 

( चित्रपट: आईशप्पथ, गीत: सौमित्र, स्वर : साधना सरगम, संगीत: अशोक पत्की  )


आमचे गाणे📝 :👇🏻


दिस चार झाले बंड, हो गुहाटी जाऊन

बाण बाण आर्त आज धनु ष्या(सा)वरुन 🏹


संज्यावेळी जेंव्हा येई आठव आठव

दूर तिथे ' मातोश्रीत ' होई 'घंटा'रव

उभा घडाळ्याचा राही, काटा वेळ पाहून


(दिस चार झाले बंड, हो गुहाटी जाऊन)


नकळत आठवणी जसे विसरले

'ठाणे'वर इथे तसे ठसे उमटले

मस्त  झाडे- डोंगर , हाटीलात राहून 🏕️


(दिस चार झाले बंड, हो गुहाटी जाऊन)


झाला जसा शिडकावा 'इडी' पावसाचा

प्रवेश झाला  इकडे एक एक आमदाराचा

'वर्षा'व सुखाचा इथला गेला ओसरून 


दिस चार झाले बंड,हो गुहाटी जाऊन

बाण बाण आर्त आज धनु ष्या(सा)वरुन 🏹


( विडंबनासाठी नेहमीच रिचेबल )

 अमोल 📝

२६/०६/२२

कान- गोष्टी


 


कळायला नको राजकारणात

या कानाचं,त्या कानाला

तरीही जर केल्यात कानगोष्टी

अनुमोदन तुमच्या मागणीला


#मागणी_कानात_घुसली 👂🏻

#कानगुंटीवार_पलटवार


( राजकीय)  अमोल 📝

४/०७/२२

Wednesday, June 29, 2022

आषाढस्य प्रथम दिवसे


 "आषाढस्य प्रथम दिवसे"

सरकारच्या मागे 'फ्लोअर टेस्ट'

गडबडून गेले त्याचक्षणी

अडीच वर्षाचे ' सीएम बेस्ट '


आषाढस्य प्रथम दिवसे

' हिंदुत्वाचे 'जमलय फिटींग

गुवाहटी पासून गोव्या पर्यत

एकदमच सगळं ओक्के सेटींग

 

आषाढस्य प्रथम दिवसे

'मी परत येईन, मी परत येईन'

दिसल्या जर इथेही विसंगती

मी,

परत लिहिन, परत लिहीन 

 

📝 ३०/०६/२२

poetrymazi.blogspot.com

Tuesday, June 14, 2022

तुकोबाच्या भेटी | विश्वगुरु आले


 श्री विठ्ठलाय नम: !

नमो सद्गुरू !

नमो विश्वगुरु !


तुकोबाच्या भेटी | विश्वगुरु आले |

झो झाला सोहळा | देहुगावात ||

जाहली दोघांची उराउरी भेट |

उरातले थेट | उरामध्ये ||

तुका म्हणे, "गुरु | तुझे कर्म थोर |

अवघेची राष्ट्र | उभे केले " ||

विश्वगुरु म्हणे | एक ते राहिले |

अच्छे दिन पाहिलेले | सत्तेआधी ||

तुका म्हणे," बाबा | ते ना बरे केले |

त्याने तडे गेले | महागाईला ||

लालकृष्ण, अटल | त्यांची रीत न्यारी|

तुझी पार्टी कोरी | " डिफर् नशिया " ||

विश्वगुरु म्हणे,| तुझ्या शब्दांप्रीत |

नाठाळाचे माथी | काठी हाणू ||

तुका म्हणे, गड्या | वृथा शब्दपीट |

प्रत्येकाची वाट |  वेगळाली ||

वेगळीये राज्ये | वेगळाले काटे |

काट्यासंगे काढू | तोची काटा ||

ऐक ऐक वाजे | ध्वनीक्षेप मंदिरी |

मातोश्री मुंबापुरी | वाट पाहे ||


विश्वगुरु निघोनिया | गेले पश्चिम दिशा |

बोलण्या अजिता | मिळेचना ||


पांडुरंग हरी! वासुदेव हरी ||


१५/०६/२२ 📝

Monday, June 6, 2022

विलंब


 मृग नक्षत्र प्रवेशाचा तरी

पकडायचा ना मुहूर्त ? ☔

त्यापुढे ही विलंबाने...म्हणजे 🌧️

 काही,राहीलाच नाहीना अर्थ 🤷‍♂️


📝 ०७/०६/२२

poetrymazi.blogspot.com

Thursday, June 2, 2022

याद आयेंगे ये पल


 


स्वागत


 'हार्दिक' स्वागत, 

तुमचं पक्षात 🪷🚩

मागील गोष्टी ( राहू दे ना) 👊🏻

कशाला ठेवायच्या लक्षात 😛🫥


#पार्टी_विथ_ 🤭


०२/०६/२२ 📝

Saturday, May 28, 2022

शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो


 *शायद फिर इस जनम में मुलाकात हो न हो*


आजच्या रंगोलीत लागलेलं हे गाणं. सर्वाना माहित असणारे, आवडणारे आणि प्रसिद्ध झालेले हे गाणे. गीत/ संगीत / अभिनय या सर्व दृष्टीने जमून आलेले गाणे. या गाण्याला मी प्रेम गीत वगैरे पेक्षा 'विरह गीत' या कँटँगरीत बसवेन. 

हे गाणे ऐकले आणि मला काहीच दिवसांपूर्वी ज्योतिष अभ्यासक श्री. सचिन मधुकर परांजपे ( पालघर)  यांनी लिहिलेला एक लेख आठवला. त्याचा सारांश असा:-

==========================

"

टेक्निकली नियतीने एक समीकरण मांडलेलं असतं. सहवासाच्या अकाऊंटचं... जोवर ती वेळ, त्या सहवासाचे हिशेब पूर्ण होत नाहीत. अकाऊंट टॅली होत नाही तोवर तो मनुष्य आपल्या आयुष्यात असतो आणि नंतर निघून जातो 


नियतीचा देणंघेण्याचा हिशेब पूर्ण झाला की माणसं आयुष्यातून काढता पाय घेतात. ..एखाद्या माणसाचं आयुष्यातून चटकन निघून जाणं (मी मृत्यूबद्दल म्हणत नाही).... एक्झिट घेऊन पाठ फिरवून जाणं आणि पुन्हा कधीच न येणं हे तुम्ही नियतीचा खेळ म्हणून जितक्या सहजतेने स्विकार कराल तेवढे तुम्ही अधिकाधिक लवचिक, शांत आणि धीरोदात्त बनत जाता. कोणाचंही असं तडकाफडकी निघून गेल्यावर विनाकारण अपराधीपणाची भावना बाळगून स्वतःला दोष न देता सावरुन घ्या. शांत व्हा आणि गोष्टी स्विकार करत चला.... दुसरा पर्याय नसतो..

=========================

*फिर आप के नसीब में*

*ये बात हो ना हो*

*शायद फिर इस जनम*

*में मुलाक़ात हो ना हो*


  वरील लेख हा या गाण्याचे एक वेगळे रसग्रहण आहे असे म्हणले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही


मंडळी,  असे अनुभव आपल्यालाही आलेत. लहानपणापासून आजपर्यंत अनेक व्यक्तींचा ठराविक कालावधीत आपला संबंध येतो मग अगदी बालपणीचे मित्र/ मैत्रीण असतील, शाळा / काॅलेज मधील असतील ,आँफीस मधले सहकारी असतील किंवा एखाद्या गावात परिचितांकडे भेटलेली एखादी कायम लक्षात राहिलेली 'अवलिया ' व्यक्ती असेल.  ब-याचदा प्रासंगिक घटनांनी त्यांची आठवण येते, त्या ठिकाणी गेल्यावर प्रसंग उभे राहतात पण परत ती व्यक्ती भेटतेच असे नाही


मात्र वरील लेखात म्हणल्याप्रमाणे ज्यांच्याशी अजून तुमचे अकांट टॅली झाले नाही, म्हणजेच दुस-या अर्थाने अजून तुमचे ' ऋणानुबंध ' तितकेच जबरदस्त आहेत असे सुहृद तुम्हाला लवकरात लवकर भेटोत ही सदिच्छा


लेखाचा शेवट आजच्या रंगोलीतीलच आणखी एका गाणयाने


चले थे साथ मिलके चलेंगे साथ मिलकर

तुम्हे रुकना पड़ेगा मेरी आवाज़  सुनकर 

( *तुम्हे रुकना पड़ेगा मेरा लेख  पढकर*😬)


शुभ रविवार 🙏

#माझी_टवाळखोरी_पुढे_चालू 📝

२९/०५/२२


www.poetrymazi.blogspot.com

Tuesday, May 10, 2022

स्वयें श्रीरामप्रभु हासती


 *प्रासंगिक राजकीय मनोरंजन :-

( सर्व संबंधितांची माफी मागून)


स्वयें श्रीरामप्रभु हासती

पक्षीय नेते अयोध्येस जाती


काका-पुतणे एक गावचे

दर्शन घेती रघुरायाचे

पक्ष सांगती महत्व हिंदूंचे

भोंग्याने तेजाची (महा)-आरती


पक्षीय नेते अयोध्येस जाती..


साठ डब्यांच्या रेल्वेमधुनी

नवसैनिकही येती फिरुनी

तज्ञ मंडळी माईक घेऊनी

सर्वही श्रोतेजन पाहती


पक्षीय नेते अयोध्येस जाती..


राजस मुद्रा, वेष मुनींचे

विरोधक ते तपोवनीचे

'ब्रिज भूषणच्या' भाव मनीचे

विरोधी भूमिका आकारती.


पक्षीय नेते अयोध्येस जाती..


निवडणूकीची सजली चौकट

त्यात पाहता महा-पालिकापट

प्रत्यक्षाहुनि 'मते'च उत्कट

प्रभूचे लोचन पाणावती 


पक्षीय नेते अयोध्येस जाती..


अमोल 📝

वैशाख शु. दशमी

Friday, April 29, 2022

गुणमिलन ( अलक )



" ऐ , तुझ्या ज्योतिषावर त्या मंगळ, शनी वर माझा अजिबात विश्वास नाही.मीच काय माझ्या कुटुंबातील एकाची ही पत्रिका मी काढणार नाही".

         

गोखल्यांच्या  मुलाच्या पत्रिकेबरोबर गुणमिलनासाठी,  त्याला आलेल्या स्थळाच्या मुलीच्या पत्रिकेतील वडिलांचे नाव वाचताना,


गुरुजींना काही वर्षांपूर्वीचे याच मित्राचे बोल आठवत होते....


अमोल 📝

poetrymazi.blogspot.com

२९/०४/२२

Friday, April 22, 2022

मुंबई दे धमाल


 https://youtu.be/fZ_2z71XD_g


आज हेच गाणं आठवतयं सकाळ पासून


हे हे कशासाठी पोटासाठी

इलेक्शनच्या तयारीसाठी

आटा पिटा कशासाठी 

महापालिका घेण्यासाठी 


अरे,  बजरंगाची कमाल


मुंबईत  दे धमाल

मुंबईत  दे धमाल


लाईनीवर आली इंजिन गाडी🚂

अरे, लाईनीवर आली इंजिन गाडी🚂

भोंग्याची वाट लावा,म्हणा बजरंग बली

अरे, चला चला पटा पटा झेंडे सारे उचला 🚩

डोईवर 'सामन्याचा' हुकुम बरसला

तैयार दंग्याला, करा हुकुम मिडियाला


 हाणा उडी मारा धक्का

निर्धार आमचा आहे पक्का


लावा जोर सोडू नका

कामाचाच मिळे पैका


बोला,  बजरंगाची कमाल

मुंबईत, दे धमाल


अमोल 📝

poetrymazi.blogspot.com

२३/०४/२२

Tuesday, April 19, 2022

आठवणीतील भोंगे


 आठवणीतले भोंगे 📣


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरुन अमुक वाजून तमुक मिनिटाला जाण्यासाठी   लोकल (  किंवा मेल/ एक्सप्रेस) तयार असते. इंडिकेटरने ती वेळ  दर्शवली  की गार्ड शिट्टी मारून मोटरमनला संकेत देतो  ( अंतर्गत प्रणाली द्वारे)  अन् क्षणात एक मोठा भोंगा देऊन गाडी सुटते ( भले ती गाडी मुक्कामाच्या ठिकाणी किती ही लेट पोहोचू दे निघण्याची वेळ मात्र अगदी परफेक्ट) 


लोकलचा हा भोंगाच. हाँर्न वगैरे उल्लेख करणे हे माझ्यामते कमीपणाचे ठरेल.  जत्रेत मिळणाऱ्या  भोंग्या पेक्षा आकाराने थोडा मोठा असणारा भोंगा लोकलच्या प्रथमदर्शनी भागात लावलेला दिसतो.


संध्याकाळी १७:५० ला असाच एक मोठ्ठा  भोंगा देऊन कोल्हापूर कडे निघालेली सह्याद्री एक्सप्रेस,पहाटे ४ च्या सुमारास शेरी नाला ओलांडला जाताना, त्याचवेळी वाजणा-या साखर-कारखान्याच्या भोंग्याशी स्पर्धा करत सांगलीत पोहोचते.

त्यानंतर साधारण १ तासाने म्हणजे ५ च्या सुमारास शांतीनिकेतन वसतीगृहात लाउडस्पीकर वरुन लागणाऱ्या भूपाळ्या/ अभंग/ आरत्या पहाटेच वातावरण भक्तिमय करुन जात असत.

माधवनगर काँटनमिलच्या वेगवेगळ्या कामाच्या वेळेतील भोंगे आणि सांगलीतील रात्री ( ८:३० वाजता)  नित्य वाजणारा भोंगा,  वेळेची जाणीव करुन ठरणारा असायचा.


याबरोबरीनेच दर महिन्याला रात्री एक जास्तीचा भोंगा सांगलीत वाजायचा, जो आजही वाजेल ९:४५ ला


म्हणजेच संकष्टीला ,चंद्रोदय झाल्यावर


असे  काही भोंगे जीवनाचा एक अगदी  सहज भाग बनून गेले होते,राहतील


#आठवणीतील_भोंगे 📝

अंगारकी संकष्टी

१९/०४/२२

Thursday, April 14, 2022

वाढिले रे अजुन दर किती


 श्री सुरेश भट यांचा आज जन्मदिन ( १५/४ ) 

"राहिले रे अजून श्वास किती" ही त्यांची रचना वेगळ्या शब्दांत 

( माफी तर त्यांची कायमस्वरूपी आहे)


"वाढिले रे अजून दर किती"

इंधना, ही तुझी मिजास किती?


आजची रात्र लोड-शेडींगची ⚡

कालचा कोळसा संपला किती?


मी कसे शब्द थोपवू माझे

दिसती विसं-गती आसपास किती?


हे कसे दिन ? ही काय आशा ?

पिळलेले एक लिंबू, जपावे किती? 🍋


सोबतीला जरी मीठ राया

मी घेऊ 'टकीला शाँट' किती 🍸


अमोल 📝

१५/४/२२

poetrymazi.blogspot.com

Monday, April 11, 2022

बुट पाॅलिश


 दोन वर्षाच्या खंडानंतर नुकताच मी परत एकदा 'लोकल' प्रवास सुरू केला.  ट्रान्स-हार्बर  ( ठाणे-वाशी-पनवेल)  हा माझा नियमीत प्रवास मार्ग .


 या मार्गावर काही गोष्टी अगदी अजूनही  आहे तशा आहेत, काहीही बदल नाही उदा. मुंबई क्षेत्रातील सगळ्यात घाणेरड्या लोकल्स, पनवेल लोकल्सची अनियमीतता, संध्याकाळच्या परतीच्या प्रवासात नेरूळहून बेलापूरला जाण्यासाठी आजही पनवेल लोकल मधे चढता न येणे, होणारा तेवढाच उशीर, नेहमीचीच गर्दी,  सर्वच स्टेशन्सची गेलेली रया इ.इ.


सुखावह वाटलेला एक बदल म्हणजे तिकीट रांगेसाठी न थांबता उपलब्ध मशीन वरुन, इच्छित मार्गाचा कोड scan करुन 'गुगल पे' करुन लगेच मिळणारे तिकीट, UTS अँप वरुन बुक करता येणारे पेपरविरहीत तिकीट तसेच सीझन पास आणि अद्यावत झालेले m- indicator अँप. हे अँप खरोखरच लोकल प्रवाशांसाठी वरदान आहे. अमुक स्टेशनवर येणाऱ्या गाड्यांचे रनिंग स्टेटस, चार ही लाईन्सच्या प्रवाशांसाठी चँटींग रुम, इतरही सार्वजनिक वाहतुकीचे ( मोनो,मेट्रो,रिक्षा,टॅक्सी,बस)  अपडेट्स अद्यावत आहेत


परत एकदा पूर्वीचे दिवस आलेत. प्रत्येक शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या काही विशेष गोष्टी असतात. मुंबई आणि परिसराचीही एक अशीच संस्कृती आहे. सेवा देणारे 'डबेवाले' जसे या संस्कृतीचा घटक आहेत तसाच आणखी एक घटक म्हणजे 'बुट-पाॅलिश' वाले


सेंट्रल, वेस्टर्न वर अगदी फलाटावर बसणारे किंवा ट्रान्स हार्बरवर स्टेशनच्या बाहेर असणारे हे सेवाकरी या सिस्टिमचा अविभाज्य घटक ठरलेत. 


ब-याचदा ग्राहक आणि हे पाॅलीश वाले यांच्यात शाब्दिक संवाद होतच नाही. आपण तिथे असलेल्या रांगेतून जायचे. आपला नंबर आला की उजवा/ डावा पाय तेथील उंचवट्यावर ठेवायचा. मग फक्त त्या बूट-पाॅलिशवाल्यांकडून हातातला पाॅलिशचा ब्रश आपटून ' टक/ठक' वाजले की पाय बदलायचा. हे असे दोन - तीन वेळा झाले की शेवटी एकत्रीत दोनदा ' टक/ठक'चा ध्वनी ऐकला की पैसे द्यायचे आणि चालू लागायचे.  तीन ते चार मिनिटाची ही प्रक्रिया. कुठल्याही शाब्दिक संवादात्मक शिवाय


बस!  असं मन ही वेळोवेळी पाँलीश करता यायला पाहिजे 🤗


ठहर ज़रा ओ जानेवाले

 बबु मिस्टर गोरे काले 

कब से बैठे आस लगाए

हम मतवाले पालिशवाले 


अमोल 📝

चैत्र. शु एकादशी

१२/०४/२२

Monday, April 4, 2022

रेकी



काल सांताक्रुझला शाळेची एक बस काही तासांसाठी हरवली. ती सापडल्यावर एक उल्लेख केला गेला की गाडी चालक नवीन होता आणि त्याने मार्गाची 'रेकी' केली नव्हती म्हणून तो गोंधळला आणि नियोजित ठिकाणांवर पोचायला बराच उशीर झाला


इतके दिवस केवळ गुन्हेगाराने / अतिरेक्यांनी अमुक तमुक ठिकाणांची , इतक्यांदा-तितक्यांदा 'रेकी' केली असे ऐकायला मिळायचे. त्यामुळे तुमच्या आमच्या सारख्या एका सामान्य वाहन चालकाबद्दल वापरलेला हा शब्दप्रयोग एक वेगळाच संदर्भ  देऊन गेला.


मग लक्षात आले की हा प्रकार नकळत ( म्हणजे याला रेकी बिकी असं काही म्हणतात हे माहिती नसताना) आपण अनेक वेळा आचरणात आणलाय. अगदी लहानपणी आपल्याला शाळेत घातल्यानंतर पालकांकडून त्या मार्गाची रेकी केली जाणे ( म्हणजेच घरापासून लागणारा वेळ, बसच्या वेळा,सायकल/ चालत जात असेल तर रहदारी,वस्ती, जवळचा मार्ग इ इ ) ते आपण नवीन ठिकाणी कामावर रूजू होण्यापूर्वी केलेली तिथली रेकी. अशी प्रत्येकाची विविध उदाहरणे असतील. मला आठवतयं लहानपणी नाटकात काम करताना नाटकाच्या तालमी इतरत्र कुठेही होत असल्या तरी मुळ प्रयोग जिथे व्हायचा तिथेच काही दिवस आधी 'फायनल रिहर्सल' व्हायची. एकप्रकारे ही सादर होणाऱ्या प्रयोगाची 'रेकीच' म्हणता येईल.


भारताचा परदेशात सामने खेळायला गेलेला संघ किंवा भारतात आलेले संघ ( क्रिकेट का इतरही? ) मुख्य मालिके आधी काही सराव सामने खेळायचा. हा ही एक 'रेकी' चा प्रकार असावा का?


दहावी/बारावी बोर्ड परीक्षा आधी आमचे हुsष्षार मित्र सराव पेपरांची 'रेकी' करायचे. या भानगडीत आम्ही मात्र फारसे पडलो नाही ☺️

रेकी ची ही मला आठवलेली काही उदाहरणे.


माझ्या मते या सगळ्याचा प्रमुख उद्देश प्रत्यक्ष तशी परिस्थिती येईल तेंव्हा आपल्याला त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा   विश्वास ( काँन्फीडन्स) यावा, फिल गूड वाटावे,  आणि सहजतेने अतिरिक्त ताण वगैरे न घेता परिस्थिती स्वीकारणे वगैरे वगैरे असावा


अशी प्रत्यक्ष जागेवरून जाऊन 'रेकी' करण्यात ज्यांची इतिहासाने नोंद करून ठेवली असे उदाहरण म्हणजे छत्रपतींचे विश्वासू 'बहिर्जी नाईक'

त्यांचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊ शकत नाही.


प्रत्यक्ष उपस्थिती ( physical ) बरोबरच आपल्या कडे  'मन' या अत्यंत उपयुक्त  आयुधाचा  रेकी करण्यासाठी कसा विविध प्रकारे ( Meditation, Dream,Motivation, visualization इ इ प्रकारे)  उपयोग होऊ शकतो याबद्दल विस्तृत माहिती अनेकांना आहेच. 

तुर्त इतकेच


अमोल 📝

विनायकी चतुर्थी ( अंकातील योग)

५/४/२२


( अवांतर : आपल्या समुहात लिहिलेले लेखन हे माझ्या 'लेखी' आपलं माझ्यासाठी 'रेकी' चाच प्रकार म्हणा ना !.. 😷)

Tuesday, March 29, 2022

कचरा फाईली


 कचरा फाईली


मंडळी, अगदी काही दिवसापूर्वी आमच्या कार्यालयाच्या नुतनीकरणासाठी म्हणून काही कालावधीसाठी आम्हाला दुसरीकडे बसायला सांगितले. आजकाल बरीच कामे संगणकावर जरी होत असली तरी त्याच्या कित्येक आधीपासूनच्या अनेक फाइली या ठेवलेल्या होत्या. शिफ्टींग होताना एवढ्या प्रचंड प्रमाणात असणाऱ्या फाईलींचे काय करायचे हा मोठ्ठा प्रश्ण होता. ज्या अतिशय आवश्यक फाईली आहेत त्या घेऊन नवीन जागी जायचे, ज्या फाईली कदाचित पुढच्या काळात संदर्भासाठी लागतील त्यांना कार्यालयीन वास्तूचे नूतनीकरण होईपर्यंत 'काँमन स्टोरेज' मधे ठेवायचे असा निर्णय झाला. हे सोडून उरलेल्या जवळजवळ ८०% फाईली या तिथेच सोडण्याशिवाय गत्यंतर नव्हते. थोडक्यात त्या सगळ्या फाईली कचरा ठरवल्या जाऊन आता रद्दीच्या भावात जाणार हे पक्के झाले होते.


नुतनीकरणानंतर जेंव्हा आम्ही मुळ जागी परत येऊ तेंव्हा येताना ज्या अती आवश्यक / दैनंदिन लागणाऱ्या फाईली ज्या सोबत घेऊन गेलेलो त्या परत आणू.  पण इथे संदर्भासाठी लागतील म्हणून काँमन स्टोरेज मधे ठेवलेल्या किती फाईलीं वरची धुळ परत झटकली जाईल याबाबत मला तरी शंका वाटतीय. कारण जेंव्हा सगळं सुस्थितीत होतं तेंव्हाही फारशा त्या फाईलींना कुणी हात लावला नव्हता. 

घर आवरताना हा नेहमीचा अनुभव.  आज आवश्यक म्हणून ठेवलेली वस्तू पुढल्यावेळी घर आवरताना मात्र हमखास कच-यात जाते. पण पहिल्यांदाच त्या कच-यात घालायला मन तयार होत नाही 


वरती जो संगणकाचा उल्लेख केला त्यातील कच-या कडे ही आपले फारसे लक्ष जात नाही. नकळत पणे अगणित फाईल्स तयार होत असतात. अनेक फोल्डर+ फाईल्स आपण तयार करत असतो. यातील असंख्य फोल्डर्स/ फाईल्स , इमेल्स काम झाल्यावर सहज उडवले जाऊ शकतात आणि अनावश्यक कच-याची विल्हेवाट लावली जाऊ शकते. पण जेंव्हा हार्ड डिस्क भरून डेटा वहायला लागतो, नवीन इमेल येणे बंद व्हायला लागतात तेंव्हा जाग येते.

आजकाल हीच गोष्ट 'मोबाईल 'उपकरणा बाबतीतही  आढळते


थोडक्यात वेळोवेळी कचरा साफ होणे आवश्यक. वर उल्लेख केलेल्या ठिकाणचा तर आवश्यकच पण अशी एक जागा आहे प्रत्येकाची वय्यक्तिक, जिथे अशा नको असलेल्या भरमसाठ फाईली अगदी कळायला लागल्यापासून विनाकारण पडून आहेत, ती जागा म्हणजे आपला 'मेंदू'.

तिथेही एकदा साफ-सफाई करायची का?


निसर्ग सुद्धा स्वतःत बदल दरवर्षी करतो. तो निसर्गचक्राला अनुसरून असला तरी आपल्याला दरवेळेला वेगळी अनुभूती देऊन जातो. झाडांची पानगळी होऊन नवनिर्मिती होत असताना आपण आपल्या मनाला हीच गोष्ट सांगितली तर? 


जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका

सडत न एक्या ठायी ठाका

सावध!ऐका पुढल्या हाका

खांद्यास चला खांदा भिडवूनी


विक्रम संवत २०७८-२९७९ 🚩

शालिवाहन शक १९४४ 🚩

शुभकृत् नाम संवत्सर 🚩


तसेच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 💐💐


अमोल 📝

poetrymazi.blogspot.com

Monday, March 28, 2022

मानाच पान


 मानाचं पान 


जागतिक अमुक तमुक दिवसाच्या शृंखलेतील आजचा दिवस मानाचा आपलं पानाचा

होय ! आज ( २८ मार्च)' जागतिक पान दिवस'



खरं म्हणजे पाश्चिमात्य पद्धतीने खाण्याची पध्दत अवलंबून आपल्याला अनेक दशकं उलटली. अनेक समारंभ, पार्ट्या,कार्यक्रमातील जेवणातील खायचा क्रम म्हणजे स्टार्टर- मेन कोर्स - डेझर्ट . हे सोपस्कार झाल्यानंतर मात्र खरा खवय्यी मित्र ( बिल वगैरे देण्याच्या भानगडीत न पडता)  कुणाकुणाला कसले पान हवे हे विचारून बाहेर पानपट्टी गाठतो आणि रंगलेल्या खाद्य मैफिलीचा शेवट टिपिकल देशी पद्धतीने होतो ( परदेशात अशा पद्धतीने शेवट होतो की नाही याची कल्पना नाही )


'खाईके पान बनारस वाला' किंवा 'पान खाये सय्या हमारो' अशा हिंदी गाण्यातून भेटणारे पान, मराठी गाण्यात एकदम आठवणीत येत नाही.  अर्थात ' मेंदीच्या पानावर' हा संदर्भ इथे उचित नाही. 

राजा बढे यांनी लिहिलेली, श्रीनिवास खळे यांनी संगीतबध्द केलेली आणि सुलोचना चव्हाण यांनी गायलेली

 ' कळीदार कपूरी पान ' ही एक लावणी यानिमित्त्याने देत आहे


कळीदार कपूरी पान कोवळं छान केशरी चुना

रंगला काथ केवडा, वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा


बारीक सुपारी निमचिकनी घालून

जायपत्री वेलची लवंग वरी दाबून

बांधले तसे या कुडीत पंचप्राण

घ्या रंगत करि मर्दुनी, चतुर्दशगुणी, सख्या सजणा


कमरेचा झुलता झोक नूर बिनधोक उरी मावेना

काजळी नजर छिनमिनी चांदणी रैना

छेडिता लालडी मुलाम तुमची गुलाम झाले सजणा

पायी पैंजण छ्न्नक छैना


अरे आजचे काय 'डिस्पॅच स्टेटस' ? २८ मार्च तारीख आहे माहित आहे ना? आजचा दिवस धरून फक्त ४ दिवस वर्ष संपायला.  का यंदा पण नेहमीसारख माझ्या *तोंडाला पाने पुसण्याचा* विचार आहे तुमचा?....


मंडळी इथंच थांबतो...


. ४ दिवस हेच वेगवेगळ्या शब्दात सायबाचे हे बोल ऐकायची तयारी करायचीय.


कामे पडली अनंत, वेळ मात्र मर्यादित

( पाने पुसली अनंत....           )


अमोल

२८ मार्च २२

Friday, March 25, 2022

घर दोघांचे, घरकुल आमदारांचे


 "चोराच्या मनात चांदणं" या चित्रपटासाठी श्री सुधीर मोघे यांनी लिहिलेले एक गाणे, आजच्या घटनेला कसे मस्त लागू पडतय बघा. (फक्त काही शब्द बदललेत)


विश्वास ठेवीला मी, विश्वास तू दिलास

जपलेस तू मला अन मीही तुझ्या मनास

एका क्षणात आपुल्या सुख साधले युगाचे

*घर दोघांचे, घरकुल आमदारांचे*🏠


वाटा कशा निराळ्या जणू एकरूप झाल्या

एका खुळ्या जगात त्याही खुळावलेल्या

जुळते अतूट नाते सत्ता- विरोधकांचे

*घर दोघांचे, घरकुल आमदारांचे*🏠


कधी भांडलोही थोडे ,थोडे दुरावलोही 

पण खूण त्या क्षणाची जपली मनात नाही

रुच(ज)ले कधी(च) बील,दोन्ही सभागृहांचे

*घर दोघांचे, घरकुल आमदारांचे*🏠


अमोल 📝

poetrymazi.blogspot.com

Saturday, March 19, 2022

८३


 खरं म्हणजे ही घटना प्रत्यक्ष घडली तेंव्हा आम्ही ३ रीत होतो. ( आमच्या बँचचं एक बरंय. शाळेत कितवीत केंव्हा होतो हे लक्षात ठेवायला सोपं आहे. ८३ ला ३ री, ८५ ला ५ वी, ८९ ला ९ वी. सुदैवानं बेसिक पदवी शिक्षण होई  पर्यंत  हा क्रम ठेवण्यात आम्ही यशस्वी ठरलो 😷)


८३ साली म्हणजे आम्ही  ३ री त असताना भारताने क्रिकेटचा विश्व चषक जिंकला . त्यावेळी आम्हाला हे कितपत माहीत होते हे सांगता नाही येणार. अर्थात ही जाणीव व्हायला काही कालावधी जावा लागला.


 माध्यमिक शाळेत असताना मधल्या सुट्टीत साने या आमच्या शाळेजवळच राहणाऱ्या  मित्राच्या घरी जाऊन अनेक सामने बघितलेत ( कधी कधी तर पुढचे काही तास बंक करून तिथेच थांबायचो ) . ८३ च्या विश्वविजेत्या संघातील गावसकर,वेंगसरकर,अमरनाथ, वगैरे खेळाडूंची ओळख वाढायला लागली.खेळाची आवड निर्माण झाली. आमच्या शाळेच्या मैदानात मधल्या सुट्टीत तर हक्काने खेळ रंगला. सायकलचे चाक,  एखाद्या भिंतीवर विट घेऊन तीन स्टंप काढून,  किंवा काहीच नाही तर तीन दगडं ( अभासी स्टंप गृहीत धरून)  ठेऊन अनेक विक्रम अनेकांनी रचले. मोठ्या स्टेडिअम वर जाऊन सीझन चेंडू ने वगैरे खेळण्याइतपत मात्र माझी लेवल गेली नाही.


अर्थात पहिला क्रिकेट विश्वचषक भारताने जिंकला त्यावरचा " ८३" हा सिनेमा बघायची इच्छा होती. ती आज पूर्ण होणार आहे.


अवांतर :-

अगदी मनापासून सांगायचं तर हिंदी सिनेमा थेटरात जाऊन बघायला मला फारसं आवडत नाही. टिव्ही वर असंख्य जहिरातीच्या भडिमारात अधून मधून सिनेमा बघायाला मिळाला तरी मला हे जास्त सोईचे वाटते ( खिशाला न लागणारी कात्री हे खरे कारण) आणि आजकाल काही महिन्यातच असे सिनेमे टीव्हीवर लागतात 


टीव्हीवर लागल्यावर बघू की

या विचारसरणीचा आणखी एक विजय होणार आज  ✌🏻


#८३_🏏


अमोल 📝

२०/३/२२

Related Posts Plugin for WordPress, Blogger...