नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, January 30, 2022

रेश्माच्या बाबांनी


 सरकारच्या या निर्णयावर मात्र अनेक भाविकांकडून स्वागतच झाले असल्याचे  एकंदर चित्र सोशल मिडियावर दिसते आहे🍷*


मग आमच्या रेश्माचे बाबा कसे मागे राहतील?

( प्रासंगिक 📝 * )


रेश्माच्या बांबानी, 'लाल पांढ-या' वाईननी

आठवडी बाजार हा आणिला

उगा नका पाहू त्यांच्या यादीला 


नवी कोरी यादी लाख-मोलाची

पाहिली ती रांग पुढे जाण्याची

घुसले बंडू नाना, मित्रवर्ग जोडीला 


उगा नका पाहू त्यांच्या यादीला 


जात होते सारे सारे तो-यात

शुक्र-मंगळाच्या त्या हो-यात

कुणी चकण्याला, डाळ-शेव घेतीला

उगा नका पाहू त्यांच्या यादीला


भीड नका ठेऊ, आल्यागेल्याची

मिरवा ओझी दहा पिशव्यांची

कुणी काही म्हणू  (दे) तुमच्या खरेदीला (खोडीला)

उगा नका पाहू त्यांच्या यादीला


( प्रासंगिक)  अमोल 

सोमवती पौष अमावास्या

३१/०१/२०२२

Sunday, January 23, 2022

सांत्वन


 सांत्वन

काल एक आमचा मित्र गेला. वर्गमित्र नव्हता पण आम्ही एका शाळेत होतो. एक दोन वर्ष लहान असेल  पण शाळेला एकत्र जाणे,  कौटुंबिक परिचय, सुट्टीत एकत्र खेळणे, कालांतराने त्याचे शिक्षणासाठी आणि आमची नोकरी निमित्य एका गावी येणे,  आणि मध्यंतरी सुटलेला संपर्क परत सोशल मिडियामुळे प्रस्थापित होणे,  विविध राजकीय - सामाजीक आणि धार्मिक गोष्टीत सहभागाने परत एकदा ऋणानुबंध तयार होणे हे आजकाल सर्रास आढळणा-या चक्रातून आमचा ही झालेला प्रवास


आणि काल सोशल मिडियावरच त्याच्याबद्दल कळलेली बातमी. वयाच्या ४३-४४ मधे तो गेला. केवढा प्रचंड आघात त्याच्या कुटुंबीयांवर झाला असेल. नात्यानुसार जवळच्या व्यक्तीला सावरायला वेळ लागेल. सोशल मिडियापासून ते प्रत्यक्ष घरी जाऊन अनेक जण मानसिक आधार देतील, सांत्वन करतील, आणि कालचक्र पुढे जात राहील


सर्वसाधारण घडणारी ही गोष्ट . पण यात एक महत्वाची व्यक्ती दूर राहते आणि माझ्या मते त्या व्यक्तीला ही आधाराची गरज असते ती व्यक्ती म्हणजे गेलेल्याचा जवळचा मित्र. त्या जवळच्या मित्राचा कदाचित कुटुंबातील सदस्यांशी  जवळीक नसते पण ते एकमेकांचे अगदी खास दोस्त आहेत अशी ख्याती मित्र परिवारात असते. तेंव्हा अशा मित्राला ही आधार देणे, त्याला बोलते करणे, त्याच्यावरचा ताण कमी करणे हे इतर मित्रांना नक्की करण्यासारखे आहे.


काहीही असो पण अशा घटनांना इथूनपुढे आपल्याला सगळ्यांनाच सामोरे जावे लागणार आहे.


'जन काय, पळभर म्हणतील हाय हाय!


अमोल 

२३/१/२२

Saturday, January 15, 2022

शेंदूर लेपन


 सध्या अनेक देवदेवतांचे आँन- लाईन दर्शन, सकाळ- संध्याकाळ आरतीची सोय त्या त्या देवस्थानने करुन दिली आहे. अनेक भाविक अशाप्रकारे दर्शनाचा लाभ घेतच असतात

प्रभादेवीच्या सिद्धीविनायकाला पूर्वी महिन्यातून एकदा जायचोच पण गेली २ वर्ष हे शक्य होत नाही आहे. पण  देवस्थानने करुन दिलेल्या सोईने दर्शन घेणे मात्र सहज साध्य झाले आहे. 



असेच दर्शन घेतानाचा हा कालचा फोटो. नियमित दर्शन न  घेणाऱ्यांना हा सिद्धीविनायक थोडा वेगळा वाटेल. होय ते बरोबरच आहे कारण ही धातूची मूर्ती काही दिवसासाठी दर्शनाला ठेवतात . मग मुळ मूर्ती?


तर साधारण गणेश जयंतीच्या आधी मुळ मूर्ती जी गाभाऱ्यात आहे तीला शेंदूर लेपन करतात आणि तोपर्यत मुळ गाभाऱ्याचे दार बंद करुन ही उत्सव मूर्ती भाविकांसाठी दर्शनाला ठेवतात.


थोडंसं वैचारिक. आपलं दैवत ही छान दिसावं, त्याच्याकडे पाहून मन प्रसन्न व्हावं, आनंद वाटावा म्हणून दरवर्षी मूर्तीला अपडेट करतो आपण. 

असं आपण ही अपडेट व्हायला काय हरकत आहे? 


आपल्या अवतीभवती अशी अपडेट करुन देणारी जी 'सौंदर्य मंदिरे' आहेत आणि तिथून बाहेर पडणारी आपली आजी/आई/बायको/ बहिण/ मुलगी/पुतणी/भाच्ची /काकू/मावशी/आत्या/वहिनी आणि हो 'मैत्रीणी'  पण जेंव्हा 'ब्यूटी' 'फूल ' होऊन येतात तेंव्हा त्यांचा नक्की आदर करा हेच यानिमित्याने  सांगणे ☺️


शुभ रविवार 📝

पौष शु. चतुर्दशी

१६/०१/२२ 

www.poetrymazi.blogspot.com

Monday, January 10, 2022

मंगळवारची पहाट


 मंगळवारची पहाट . सिध्दिविनायक मंदिरात दर्शनाला  जाण्यासाठी पहिली लोकल पकडून दादरला उतरलो आणि टिळक ब्रीजच्या बाजूने प्लाझाकडे चाललो. रात्री दुतर्फा रस्त्यावर ठिकठिकाणी लागलेल्या शेकोट्या अजूनही धुमसत होत्या. 

पहाटेच्या धुक्यात मंद दिसणारे दोन दिवे हे शेअर टँक्सी चे असू देत अशी मनोमन प्रार्थना केली आणि तसेच घडले.

खच्चून भरलेल्या टँक्सीत फूल हिटर लावल्यानंतरही घामाचा एक ही बिंदू न येता प्रभादेवीला उतरून दर्शन रांगेतून पुण्याच्या सारसबागेतील स्वेटर मधे असलेल्या गणपतीप्रमाणेच प्रभादेवीच्या बाप्पाला बघताना मन प्रसन्न झाले. कुडकुडत कुडकुडत त्याही अवस्थेत उंदीर मामाच्या कानात इच्छा व्यक्त केली की बाप्पाला सांग पूर्वीचे 'घामाचे'( अन कामाचे) दिवस लवकर आण रे देवा'

दर्शन घेऊन परत दादरला आल्यावर छबिलदासच्या दुकानात गरमगरम वडा पाव बरोबरच शेगडीवरची कणसं विकली जात होती. प्रसादाचे कणीस घेऊन स्टेशन कडे निघालो 

दादर स्टेशनच्या फलाट नं १ वर टिटवाळा स्लो पकडून खिडकी कडे झेप घेतली आणि थबकलो. चक्क बर्फ बिंदू जमा झाले होते. हाताचा स्पर्श करुन तो बर्फ थोडा ओंजळीत घेण्यासाठी हातातील ग्लोज काढले तोवर शीव स्टेशन आले होते आणि ओळखीच्या आवाजात उद्घोषणा होत होती


शीव,  शीव , शीव. वर्क फाॅर्म होम म्हणत सूर्य डोक्यावर येईपर्यंत एवढी ताणून द्यायची?  त्यात काय थंडीची फूस. आम्हाला नाही वाटत आराम करावा? पण आहे का सूट  #@*&&


आणी गाडी जी सुसाट सुटली.. .की विचारु नका 😷

 

( गारठलेला ,आजच्या पुरता WFH वाला)  अमोल 📝

११/१/२२

Saturday, January 8, 2022

रामदास कामत


 रामदास कामतजी,  

भावपूर्ण श्रध्दांजली 🙏



"प्रथम तुज ऐकता, जीव वेडावला"


 नाट्यगीतांची आवड निर्माण व्हायला अर्थातच तुमच्या स्वरांचा मोठा वाटा होता .


देवा तुझा मी सोनार

नको विसरू संकेत मिलनाचा

हे आदिमा  हे अंतिमा

बहुत दिन नच भेटलो सुंदरीला

प्रेम वरदान स्मर सदा


ही काही गाणी तुमच्या आवाजात ऐकणे हा सुखसोहळा असायचा


अर्थात शेवटी

' देवाघरचे ज्ञात कुणाला '?


तरीही नाट्यसंगीत आणि रामदासजी कामत ही केमिस्ट्री कायम लक्षात राहील अगदी

'विश्व'नाट्य' सूत्रधार,तूच श्यामसुंदरा'

 या ओळींप्रमाणे


म्हणूनच म्हणावेसे वाटते

' चिरंजीव राहो जगी नाम रामा' 


🙏🙏


📝 ९/०१/२२

poetrymazi.blogspot.com

Wednesday, December 29, 2021

मागची खिडकी


 मागची खिडकी


सध्या नवीन आलेल्या सिटी-बस मधून जर तुम्ही प्रवास केला असेल, तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की बसमधील सिटची रचना वेगळ्या स्वरूपात आहे. म्हणजे पूर्वी कसं चालकाच्या मागे एकच आडवी सिट असायची जिथे बसलं  की बसमधील  मागचे सर्व प्रवासी दिसायचे. पण आता अशा उलट सिटा बसमधे मध्यात आणि अगदी शेवटी पण बसवल्यात. शेवटी बसवलेल्या सिटा तर एवढ्या उंच आहेत की तिथे बसलं की बसच्या अगदी शेवटी असणारी मोठी खिडकी (ज्यावर 'संकटकालीन दरवाजा' असे लिहीलेले असते ) अगदी सहज लक्ष वेधून घेते.



सहसा मी या मागच्या सिटवर बसत नाही पण परवा आँफीस मधून येताना दुसरीकडे बसायला जागाच नसल्यामुळे तिथे बसायला लागले. प्रवास सुरु झाल्याक्षणी नजरेत आली ती ही संकटकालीन मदतीस धावणारी ' मागची खिडकी '


दृश्य फारसे वेगळे नाही. ट्रॅफिक जाम ,त्यातही पुढे जायला पाहणारी वाहने, बसने मागे टाकलेली वाहने. जिथे तिथे पराकोटीचा संघर्ष. 


क्षणभर एक वेगळा विचार मनात आला की आपल्या प्रत्येकाच्या मनात एक अशी खिडकी आहे. त्याला फारतर आपण मार्गदर्शक खिडकी म्हणू. त्या खिडकीतून जरा मागे डोकावू. गेलेली अनेक वर्षे, संपणारे हे वर्ष, झालेल्या चूका, मिळालेल्या संधी, आलेल्या अडचणी आणि महत्वाचे म्हणजे आपल्याकडून घडल्या गेलेल्या चांगल्या गोष्टी/ आपण उमटवलेला ठसा,आपले यश


याचे विश्लेषण करुन पुढचा करायचा प्रवास.  

मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात ही अशी एक खिडकी शिकवतात SWOT ANALYSIS म्हणून 


"बस" नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्याच मनातील 'संकटकालीन मार्गदर्शक खिडकीतून' एकदा डोकावयाचे आणि परत आपला नियमीत प्रवास सुरु ठेवायचा यासाठी तुम्हाला सगळ्यांना  शुभेच्छा 💐


( प्रवासी)  अमोल 📝

'सफला एकादशी'

३०/१२/२१


www.poetrymazi.blogspot.com

Saturday, December 18, 2021

पेपर मिळू दे मिळू दे


 रविवारची टवाळखोरी 📝*

( * प्रासंगिक मनोरंजन) 


पेपर मिळू दे मिळू दे, भावा पास होऊ दे

आली परीक्षा - परीक्षा, प्रश्ण आम्हा मिळू दे

पेपर मिळू दे मिळू दे, भावा पास होऊ दे


परीक्षार्थी पाखरा, पेपर लिही सारा

आले दलाल अंगणी, त्यांना पैसे देऊ करा

परीक्षार्थी पाखरा...।


मला पेपर दाखवी, दिसे पुढची नोकरी

आता पुस्तकं हुडकून शोधू उत्तरे ही जरा.

पेपर मिळू दे मिळू दे, भावा पास होऊ दे..।


ध्येय करुन मेरिटचा,पेपर लिहितो काॅपीचा

आता म्हाडाच्या खात्यात सेवा रुजू दे जबरा...


परीक्षार्थी पाखरा...।


पेपर मिळू दे मिळू दे, भावा पास होऊ दे

आली परीक्षा - परीक्षा, प्रश्ण आम्हा मिळू दे


( कायमचा अभ्यासू)  📝

मार्गशीर्ष कृ.प्रतिपदा

१९/१२/२१

Wednesday, December 8, 2021

मनीच लग्न


 *प्रासंगिक लग्न-सोहळा

( मनीचं लग्न 🐈‍⬛)


'मनी'sच लगीन झोकांत लागलं 

'बोको'बांवर मिम्स काढलं

'विकी'बाबा नटून मंडपात थांबला

मिडियाचा वृत्तांत इकडे तिकडे चालला


तिथे नाही 'रेंज' म्हणे पुढे येऊन सासरा

आम्ही तुमच्या 'मनी'ला देऊ कसा आसरा

मोबाईलच्या स्क्रिनचा देऊन झाला दाखला

असं म्हणताच पटकन टाॅवर ही लावला


मनी'sच लगीन झोकांत लागलं 

'बोको'बांवर मिम्स काढलं


उंदराचे पदार्थ मेजवानीला ठरले

हळदी अन संगीताचे, कार्यक्रम लांबले

तरा तरा तो-यामधे प्राणी सर्व जमले

मनीच्या लग्नाला  नियम नाही लागले


मनी'sच लगीन झोकांत लागलं 

'बोको'बांवर मिम्स काढलं 


चंपाषष्ठी 📝 ( ९/१२/२१)

Wednesday, December 1, 2021

वद जाऊ कुणाला शरण


 https://youtu.be/sRnz15t-JJc


( मुळ गाणे: वद जाऊ कुणाला शरण

नाटक : संगीत सौभद्र) 


आमचं : संगीत अभद्र 📝


वद जाऊ कुणाला शरण 

करील जो हरण 'ओमिक्राॅनचे'

मी धरीन चरण त्याचे !


अग लस-घे !!


बहु ताप बंधु- बांधवा, प्रार्थिले बघुनी दु:ख जनांचे!

ते विफल न होय त्यांचे !


अग लस-घे !!


मग जिल्हा- बंदी मात्र ती, लावुनी कष्ट इ-पासचे!

न चालेचि काही त्यांचे!


अग लस-घे !! 


जे मास्क लावुनी नाकापुढे, वाचले थवे मानवांचे !

अनुकूल होती साचे!


अग लस-घे !!  💉


📝 २/१२/२१

poetrymazi.blogspot.com

Monday, November 22, 2021

पहाटे पहाटे मला जाग आली



 २ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल...📝


पहाटे पहाटे मला जाग आली

अपुल्या सत्तेची कृती फेल झाली


मला आठवेना.. तुला आठवेना 

कशी रात्र गेली कुणाला कळेना

तरीही काकांना खबर लागली


अपुल्या सत्तेची कृती फेल झाली !


सत्तेचे डोहाळे, निमित्य कशाला?

बाजू ठेऊ या 'हात' नको ' बाणाला' 

मनमिळाऊ तात्या हे राज्यपाली


अपुल्या सत्तेची कृती फेल झाली !


कसा रामपारी सुटे गार वारा

माझ्या खुर्चीला देशील का सहारा

करु सुरवात बोलणे, हालचाली 

अपुल्या सत्तेची कृती फेल झाली !



पहाटे पहाटे मला जाग आली

अपुल्या सत्तेची कृती फेल झाली ! 🌷⏲️


कार्तिक कृ चतुर्थी ( २३/११/२१)

अंगारक योग

निर्विघ्नं कुरु मे देव


 निर्विघ्नं कुरु मे देव !

काकूंचा फोन येऊन आठवडा होऊन गेलेला,निदान या आठवड्यात तरी उत्तर द्यायला पाहिजे होते. खरं म्हणजे  विचारलेला प्रश्ण तसा नियमितच होता. लग्न होईल का?  सगळं व्यवस्थित होईल ना?  

लग्न होण्यासंबंधीचे नियम पडताळून,  महादशा - अंतर्दशा ची संगत लावून साधारण उत्तर ही तयार होते

 पण ...

काकूंनी सांगितलेली पार्श्वभूमी. त्या काही बोलल्या नसत्या तर,  सगळं व्यवस्थित होईल, योग आहेतच ,अमूक वर्षी अमूक दशेत, अमूक ग्रहांच्या विदशेत २,७,११ ही तिन्ही स्थाने मिळतायत , करा सुरवात मुली बघायला ' असं लिहून पाठवायला फारतर एखाद दुसरा दिवस लागला असता.


पण त्या बहिण -भावांची कथा ऐकल्यावर तो हादरला.  वडील नाहीत. आई नुकतीच कोरोनात गेली. लहान बहिण डिप्रेशन मधे, स्वतःला चांगली नोकरी पण लग्न होत नाही आहे.

आणि ही परिस्थिती, काकूंनी  न सांगता आपल्याला पत्रिका बघून का ओळखता आली नाही? याचे वैषम्य त्याला जास्त होते.

 दुसऱ्यांचे प्रारब्ध बघता बघता आपल्यासाठी ही नियतीची योजना असते आणि त्याप्रमाणेच जावे लागते याची जाणीव ही घटना देऊन गेली. 

 ग्रह अनुकूल असूनही हो 'लग्न' होईल हे ठाम पणे कळवणे त्याच्या जीवावर येत होते. तुझ्या मुलीसाठी असं स्थळ आले असते तर तू स्वीकारले असते असतेस का? हा मनातील प्रश्ण ही त्याला अस्वस्थ करत होता.

यासाठीस तो अजून उत्तर द्यायचा थांबला होता. आज सर्व कन्सल्टिंग बंद ठेवायचे त्याने आधीच ठरवले होते.

आज चतुर्थीची आवर्तने करताना दोन आवर्तनं त्या बहिण-भावांसाठी म्हणायची आणि परत एकदा पत्रिकेतील 'निर्णायक घटक' शोधायचे आणि काकूंना या आठवड्यात उत्तर द्यायचेच हे ठरवून त्याने 'वक्रतुंड महाकाय ' म्हणायला सुरवात केली


"निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा!"  हे थोड्या मोठ्या आवाजात म्हणले गेलेलं त्याच्या कानाला जाणवलं


( अमोल)

Wednesday, November 17, 2021

नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण


 नेटकरी -  ही एक नवीन जात सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. या नेटक-यांना समर्पित


( आदरणीय साने गुरूजींची माफी मागून 🙏)


आता करुनी डेटा आँन,

नको राहू दे कुठले भान

नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण


मिडीया चॅनेल उठतील

बातम्या सा-या पेरतील

'मेटा-कुटीला' सारे येऊन पेटवूया हे रान 😷


कोण आम्हा अडवील

कोण आम्हा रडवील

अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण


नेटक-यांची फौज निघे

'पुढे ढकलणे ' चोहीकडे

विनोदी टोमणे, मिम्स हीच आमची जान


पडून ना राहू आता

मारुया शाब्दिक लाथा

'नेटकरीच' कामकरी, भांडणावर ठाम


आता करुनी डेटा आँन,

नको राहू दे कुठले भान

नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण


( नेटकरी)  अमोल 📝

कार्तिक शु चतुर्दशी

१८/११/२१

Sunday, November 7, 2021

आँनलाईन सोहळा


 निघालो_घेऊन_भक्तांची_पालखी 🚩🌷

(आधी पोपोबा आता विठोबा *)


विठोबाच्या मार्गी । नमोबा आले ।

तो झाला सोहळा। आँनलाईन II


भरवीला पाया । पंढरीसी थेट

 । उरामधे पताका I वैष्णवांची II 🚩


हरी म्हणे “नम्या। तुझे कर्म थोर;

अवघाचि संसार । सोडूनी दिला।।”


नमोजी  म्हणे । एक ते राहिले; ।

 अच्छे, आश्वासन इलेक्शनचे !!


माऊली म्हणे, “बाबा ते  बरे न केले,

त्याने तडे गेले। संसाराला II


नमो,पुन्हा म्हणे । माझ्या शब्दामुळे

वाट्टेल ते खेळले । भक्तांतीत II


विठू म्हणे गड्या । वृथा शब्दपीट

प्रत्येकाची वाट । लावलीसी II


वेगळिये वाटे । वेगळिये काटे;

परि तसेच वागे । तूझाही पक्ष II


ऐक ऐक वाजे । घंटा ही पोपची।

कॅमेरा बाहेरी । वाट पाहे.” II


दोघे लाँगाऊट I  गेले दोन दिशां

कवतिक भक्तांना आवरेना । 😎✌🏻💐


( विनायकी चतुर्थी, ८/११/२१ 📝)

*काल्पनिक, मनोरंजन हा हेतू

Thursday, October 28, 2021

राशी-रंजन


 राशी रंजन 💫⚡✨


सहज मनात विचार आला 'ज्ञानेश्वर' नावाच्या  नव-याला लाडाने  'दाऊद' असं हाक मारणा-या माऊलीची रास काय असावी, 

माझ्यामते 'वृश्चिक ' 🤩

( अर्थात यावर इतर ज्योतिषींचे वेगळे ही मत असू शकते. )


मनोरंजनासाठी *  आता वेगवेगळ्या राशीच्या बायका "ज्ञानेश्वर"  हेच नाव असलेल्या त्यांच्या लाडोबा नवरोबांना काय म्हणतील याचा एक काल्पनिक विस्तार:-


मेष: 'ज्ञान्या'  चल फिरून येऊन जरा, गाडी काढ 🚗


वृषभ:    ज्ञानू, मेरी जानू, जायचं दिवाळी खरेदीला आज,  प्लीज 😌


मिथुन: ओ ध्यानेश, जरा जळमटं काढा, ते बघा तिकडं आहेत अजून ♾️


कर्क: ज्ञानवंतच रे तू माझा, पोरांसाठी जंताचे औषध सांगितलेले, विसरलास ना?


सिंह:-  माय डिअर डाँन, मला बिग बाॅस बघायचं,  आवर तुझ्या बातम्या लवकर 😡


कन्या : मला पण तुला दाऊदच म्हणावं लागेल का रे ? शकील म्हणलं तर चालेल ना तूला? 🤯


तुळ: ज्ञानेशा, दमलास का रे आज. मग उद्या करु खरेदी दिवाळीची 🥳


धनु - ज्ञाना, चहा टाकतोस का जरा आम्हा मैत्रिणींसाठी 🤠


मकर: मला जास्त ज्ञान द्यायचं नाही काय, ज्ञानानु 😶


कुंभ: ज्ञानेश्वरा, कसा रे तू?  अरे ती अनन्या म्हणजे चंकीची मुलगी. ऐवढं माहित नाही? माझी लायकी घालवतोयस 🤧


मीन: ध्याना, जरा पाय चेपतोस का रे? खुप दमलीय मी आज खरेदी करुन 😿


( * काल्पनिक ) अमोल 📝

poetrymazi.blogspot.com

Tuesday, October 5, 2021

तुझा विसरन व्हावा


 https://youtu.be/tEq8ea3Ux-c


दरम्यानच्या काळात आम्ही केलेल्या या प्रार्थनेचे फळ, तुम्ही बघतच ( वाचत ) आहात


हेंचि दान देगा झुक्या

तुझा सर्व्हर डाऊन न व्हावा

सर्व्हर डाऊन न व्हावा

तुझा विसरन व्हावा


इस्टा, फेसबुक आवडी

हेंचि माझी प्रिय जोडी

माझी प्रिय जोडी, हेंचि माझी प्रिय जोडी


न भेटे शांती आणि संपदा

व्हाटसप चालू ठेवा सदा 

व्हाटसप चालू ठेवा सदा 


टुकार म्हणे,


टुकार म्हणे, झुकोबांसी

सुखे घालावे आम्हासी

सुखे घालावे आम्हासी

सुखे घालावे आम्हासी


हेंचि दान देगा झुक्या

तुझा सर्व्हर डाऊन न व्हावा

सर्व्हर डाऊन न व्हावा

तुझा विसरन व्हावा


( अमोल)  📝

भाद्रपद. कृ चतुर्दशी

०५/१०/२१

Tuesday, September 28, 2021

गुंतता हृदय हे


 गुंतता हृदय हे 💖


कमलदलाच्या पाशी 🌷

हा प्रणयगंध परिमळे, तुझ्या अंगाशी

गुंतता हृदय हे ....


'मत्स्यगंधा'  नाटकातील हे वसंत कानीटकरांनी लिहिलेले 'ह्दय गीत' असू दे किंवा ' सन्यस्त खङग' मधील हे गाणे


'हृदयां'बुजी लीन लोभी  अलि हा

मकरंद ठेवा लुटण्यासाठी आला !

बांधी जिवाला सुखाशा मनी

'मर्मबंधातली' ठेव ही प्रेममय !! 


मंडळी, मर्मबंधाची जागा नक्की कुठे असते?  माझ्यामते आपल्या हृदयात. 


अशा अनेक सुमधूर आठवणींचा खजिना असलेले आपले ' हृदय ' याला वेळोवेळी भेट देणे गरजेचे आहे. आज तर हक्काने. नाही नाही गुलाबी वादळ आहे म्हणून नव्हे तर आजचा दिवस तसा खासच आहे


'दिवसरात्र ओढणी या मनास लागते

तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते

मैत्रिणीस सांगते तुझी 'अमोल' योग्यता

'हृदयी'  प्रीत जागते,  जाणता अजाणता 


आहाहा!  गदिमा- बाबूजी- आशा ताईं या सगळ्यांच्या हृदयातून बाहेर पडलेली ही कलाकृती आजही रसिकांच्या हृदयात ठाण मांडून आहे


'हृदयी' जागा तू अनुरागा

प्रितीला या देशील का? 

या हृदयाच्या लाॅकर मधे सगळ्यात जास्त जागा प्रितीने व्यापली असल्यास नवल नाही ( बाकी रक्त, वाहिन्या या सगळ्या अंधश्रध्दाच 😬)


मंगेश पाडगावकरांची ही रचना :- म्हणजे हृदयाची दुखरी बाजूच नाही का?

नि:शब्द आसवांनी समजाविले मनाला

की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला

माझ्याच मी मनाशी हे गीत गाईले


मी बोलले न काही नुसतेच पाहिले

'हृदयात' दाटलेले 'हृदयात' राहिले


इथे मात्र मला या हृदयात कुठेतरी एकाकी मन सापडते

एकदा का त्याला समजावले की त्याची अवस्था काहीशी अशीही होते


आज माझिया किरणकरांनी

ओंजळीमधे धरली अवनी

अरुणाचे मी गंध लावले


आज 'हृदय' मम विशाल झाले

त्यास पाहुनी गगन लाभले


तर मंडळी, ही काही माझ्या हृदयात स्थानापन्न असलेली आठवणीतील 'हृदय' गाणी. तुम्ही ही आजच्या  ' ह्दय दिनाच्या' निमित्याने उजळणी करा..


" हृदय सलामत तो ..❣️" 


( सुहृद)  अमोल 📝

२९/०९/२१

#जागतीक_ह्दय_दिन

Friday, September 17, 2021

आजी मी माजी पाहिले


 https://youtu.be/ID9mtiyQILg

 


( आजी - माजी - भावी  , चर्चेला समर्पित , मुळ गाण्यात थोडाच बदल करुन

 मुळ गाणे: अजि मी ब्रह्म पाहिले )


आजी मी माजी पाहिले

आजी  मी भावी पाहिले


अगणीत भक्तजन वर्णिती ज्यासी

कटिकर नटसम चरण सत्तेवरी, बाजू राहिले


आजी मी माजी पाहिले


एकनाथाच्या भक्तिसाठी, धावत आला तो जगजेठी

खांदी कावड आवड मोठी, पाणी वाहिले


आजी मी माजी पाहिले


चोख्यासंगे ढोरे ओढिता, शिणला नाही तो तत्त्वतां

जनीसंगे दळिता कांडिता, गाणे गाईले


अजि मी माजी पाहिले


दामाजीची रसिद पटवली, कान्होपात्रा ती उद्धरिली

अमृतराय ह्मणे ऐसी माउली, संकटा टाकिले


आजी मी माजी पाहिले

आजी  मी भावी पाहिले


( अमोल) 

//

भाद्रपद शु  त्रयोदशी 📝

शनी प्रदोष 🌷

१८/०९/२१

Sunday, September 12, 2021

बुध्दीबळ शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र


 बुध्दीबळ शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र ⚜️


मंडळी नमस्कार, 🙏


बुद्धीच्या देवतेचा सध्या उत्सव सुरु आहे. कुठलाही कलाकार मग तो गायक, अभिनेता, नर्तक, वादक, चित्रकार ,लेखक,कवी असू  दे 

वर्षातील एकदा तरी आपली कला कलेची देवता श्री गजानना चरणी सादर करावी हे सर्वच कलाकारांना मनोमन सांगणे.  गणेशोत्सव ही या सगळ्यांसाठी विशेष पर्वणी.



याच उद्देशाने माझ्या बुध्दीच्या कुवती नुसार लिहिलेला  हा लेख बाप्पाला अर्पण  📝


तर मंडळी, लहानपणा पासून असलेली  बुध्दीबळाची आवड आणि वयाच्या एका टप्प्यावर लागलेली ज्योतिष विषयाची गोडी आणि आज या दोन्ही क्षेत्रातले बेसिक नाॅलेज यावरून या दोन्ही गोष्टींची तुलना, काही समान धागे जोडण्याचा केलेला हा प्रयत्न


पटावरील ६४ घरांमधे रंगणारे दोघांमधील युध्द आणि पत्रिकेतील १२ भावांमधे असणा-या जन्मकालीन ग्रहांशी गोचरीने होणारे ग्रहयोग ( नियतीने टाकलेले डाव ) हे माझ्यासाठी  कायमच उत्सुकतेचे विषय राहतील

पटांवरील प्रत्येक सोंगटी आणि पत्रिकेतील प्रमुख ग्रह यांची मी अशी बरोबरी केली आहे


रवी - राजा 🌞👑

आत्म्याचा कारक ग्रह - रवी

पटावर ज्याच्या साठी खेळ रंगतो  तो राजा

दोघांनाही चेक बसला, सोडवता नाही आला तर खेळ खल्लास


मंगळ / वझीर 💥

मंगळाला सेनापती म्हणले आहे, वझीर हा पटावरचा खरा सेनापती


शनी / घोडा 🐴

अडीच + अडीच + अडीच = शनीची साडेसाती आणि घोड्याची पटावरील अडीच घरांची चाल. 

कधी कुणाला ... 🦄 ( असो)

सळो की पळो करुन सोडेल,  गर्व हरण करेल सांगता यायचे नाही


हत्ती / गुरु 🐘 🌕

पटावर  राजा पासून सगळ्यात लांब असणारा,  अगदी सरळ मार्गी असणारा,   पण वेळोवेळी राजाला मार्गदर्शन करणारा हत्ती , आणि पत्रिकेतील गुरु सारखेच


कॅसलीन रूपाने  राजाची हत्तीशी  होणारी सल्लामसलत, मार्गदर्शन आणि वेळप्रसंगी गरज लागलीच तर मैदानात उतरणारा हत्ती म्हणजे पटाला लाभलेले गुरुबळच.


दोन उंट - बुध/ शुक्र 🐪💫🌟

हे दोन्ही ग्रह अशुभ ग्रहात येत नाहीत पण अनेक वेळा यांची पत्रिकेतील स्थिती जपून अभ्यासावी लागते. वक्री, स्तंभी, उच्च-निच्च ग्रह केंव्हा तिरपी चाल चालवून धोक्याची घंटा वाजवतील हे सांगणे अवघड


प्यादी / चंद्र 🌙♟️

संख्येने जास्त असणारी प्यादी,  आणि  पत्रिकेत विविध कला दाखवणारा चंद्र यात कमालीचे साम्य आहे. राशी, नक्षत्र,  दशा, प्रश्णकुंडलीतील चंद्राचा भाग, इतर ग्रहांशी जमणारी केमिस्ट्री याबरोबरच मनाचा कारक ग्रह चंद्र


मूर्ती लहान पण कीर्ती महान. याच मनाच्या खंबीरतेवर प्रतिस्पर्ध्याच्या पहिल्या घरात पोचून प्यादाचा वजीर बनू शकतो जे इतर कुणालाही शक्य नाही. 

इतर सोंगट्यांना सगळ्यात जास्त सपोर्ट हे प्यादे देते. धारातीर्थी ही पहिल्यांदा तेच पडते तर वजीर बनून पोर्णीमा ही अनुभवते


मंडळी , कशी वाटली तुलना?  आयुष्यात बुध्दीबळाचे अनेक डाव तुम्ही खेळता कधी जिंकता कधी हरता. पण पत्रिकेत ग्रहांचा जन्मत: सुरु झालेला डाव तुमच्या अंतापर्यंत सुरु राहतो. त्यात काही लढाया नियती तुम्हाला जिंकवते  काही  डावपेचात हरवते. इथे नियतीच फक्त  खेळत असते, आपल्यासाठी..


लेखनाचा शेवट भाऊसाहेब पाटणकरांची एक गझल थोडीशी बदलून


क्षणाक्षणाला रचती डाव

खेळ असे हे रंगलेले

शौर्य-बुध्दीचे प्रारब्ध त्यांच्या

पट-पत्रिकेवर दिसलेले

कधी असते खेळलेले

कधी असते ठरलेले


मोरया 🙏🌺


( अमोल) 

१२/०९/२१

भाद्रपद. शु षष्ठी

Wednesday, September 1, 2021

बाबू समजो इशारे


 बाबू समजो इशारे ,हाँर्न पुकारे पं पं पं 📢


नितीन गडकरी यांनी गाड्यांचे हाॅर्न कर्णकर्कश्य नकोत , पारंपारिक वाद्य - संगीत वगैरे असे सुचवल्यावर काही खास गाड्या साठी काही हाँर्न/ धून/ गाणी सुचवत आहे 📝


शोरुम मधून नवीन गाडी घेताना- डिफाॅल्ट धून-🚘

बाबूजी धीरे चलाना, खड्डे मे जरा संभालना

हां, बडे मोटे है, बडे मोटे है स्पिड - ब्रेकर, इस रस्तेमें.

बाबूजी ...


सायकलवाली/ वाला: 

बाय-सिकल तुरुतुरु ,वेग वाढवी हळूहळू  डाव्या बाजूने वाट काढली 

आता कुठल्याही रस्त्यावर,कुठल्याही बाजूने सायकल सळसळली.


स्कुटीवाली: 

बाबू समझों इशारे, पैर दिखाये, ब्रेक ब्रेक ब्रेक..


बाईकवाला: 

शिरस्त्राण विसरताच ,शिट्टी तिथे वाजली, 

अरे पुन्हा पाकिटाचा भार करा खाली


रिक्षावाला: - 

वाट पाहूनी जीव शिणला, पॅसेंजर गडी कुठं हा गेला

चला चला शेअर करा.. रिक्षा थांबली 


लाल परी: 

एक थांबा सुखाचा, शंभर थांबे भरलेले,

चल लवकर तिकीट काढ रे ,पुढच्या प्रवासाचे


मध्य रेल्वे लोकल : 

कामावर जायला उशीर झायला 

वाट पाहतोय फलाटवाला माझी वाट पाहतोय फलाटवाला.


पश्चिम रेल्वे लोकल : - 

मेनलाईन वरती स्टेशनवरचा

सिग्नल हिरवा हवा

चला जाऊ चर्चगेटला भरा भरा.


हार्बर रेल्वे लोकल :-

कशी नशिबाने थट्टा आज मांडली,

 ती मोडकी लोकल या लाईनवर आज टाकली.


दख्खनची राणी:-

परी हूँ मै, बरी हू मै 🚂


शिवनेरी - 

मी कात टाकली, मी कात टाकली

मी बुडत्या महा- मंडळाची बाई लाज राखली. 

ठाणे-स्वारगेट, ठाणे-स्वारगेट ,

पुणे-दादर-बोरिवली

सिटा भरुन सगळ्या आरामात नेती

मी कात टाकली..


ट्रकवाला : ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट


कंटेनरवाला:- 

यहाँ के हम सिकंदर, 

चाहे तो ठोक-दे सबको अपनी रेंज के अंदर

हमसे बदला मत लेना मेरे यार


( वाजवण्यात पटाईत ) अमोल 📝

श्रावण कृष्ण दशमी

०१/०९/२१

Monday, August 9, 2021

गुरु ठाकूर vs सुरु टुकार ( भाग ३- सन २०२१ )


 गुरु ठाकूर vs  सुरु टुकार ( भाग ३- सन २०२१ )


१) गुरु ठाकूर :-


सुख वेचिन म्हणण्या आधी

घन दुःखाचा गहिवरतो

अन् दुःख सावरू जाता

कवडसा सुखाचा येतो..

या ऊन्ह सावली संगे

रमण्यात ही मौज म्हणूनी

मी हसून हल्ली माझ्या

जगण्याला श्रावण म्हणतो


२) सुरु टूकार 📝 :-


लोकल म्हणण्याआधी

डोस दुसरा आठवतो

अन दंड सावरु जाता

फलाट स्टेशनचा दिसतो

या कठोर निर्बंधा संगे

जगण्यात मौज म्हणूनी

मी ठरवून हल्ली आता

"वर्क फ्राॅम आँफीस" करतो 😉


poetrymazi.blogspot.com


श्रावण ( शु) प्रतिपदा

०९/०८/२०२१

Related Posts Plugin for WordPress, Blogger...